पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, २६ लाखांच्या विदेशी मद्याचा कंटेनर जप्त

पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, २६ लाखांच्या विदेशी मद्याचा कंटेनर जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर यांनी पालघर येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानीवडे टोल नाक्या जवळ लाखोंच्या किंमतीच्या सेलवास बनावटीच्या मद्याने भरलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे. ज्यात सुमारे २६ लाख रुपयांचे विदेशी मद्य साठा सह ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. हा विदेशी मद्य साठा पालघर मार्गे सेलवास हुन मुंबई मध्ये विक्री करण्यास घेऊन जात होते.

पालघर राज्य उत्पादन विभागाला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानीवडे टोल नाक्याजवळ सापळा रचून राजस्थान पासींग असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनर क्रमांक आरजे. ११ जीबी ७८७३ या कंटेनरला ताब्यात घेऊन तपासणी केली असता कंटेनर मध्ये लाखों रुपये किमतीचा सेलवास बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. कंटेनर चालकाला याबाबत विचारपूस करण्याआधीच चालक फरार झाले असल्याची माहिती ही राज्य उत्पादन शुल्क, पालघर विभागाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की २५ जून रोजी पहाटे पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मुंबई शहरात बेकायदा दारू विक्री करण्यासाठी ट्रक कंटेनर सेलवास हुन खानवेल-पालघर मार्गे मुंबई जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अशोक लेलँड कंपनीचे दहा चाकी ट्रक कंटनेर आरजे.११ जीबी ७८७३ यांना खाणीवडे टोलनाका परिसरात पकडण्यात आले. त्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये इंपिरियल ब्लू, रॉयल स्टॅग, मॅजिक मोमेंट्स, हायवर्ड्स ५०००, जॉन मार्टिन, किंगफिशर, टुबोर्ग, टॅग व ब्लेंडर्स प्राईड आदी विदेशी मद्याचे ७५० मिलीचे ४५ बॉक्स, १८० मिलीचे २१० बॉक्स व बिअर १९९ बॉक्स असे एकुण ४४६ बॉक्स मिळून आले. याची एकूण किंमत बाजारामध्ये २६,३७,९६०/- रुपये इतकी आहे. त्याशिवाय पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ५५ लाख किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे ट्रक कंटेनर देखील ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८७,७५,४०० रुपये इतकी असल्याची माहिती आहे तसेच अंधाराचा फायदा घेवून वाहन चालक अत्ता ऊल्ला व बनावट मद्याचा व्यापारी निधी शर्मा हे दोघे पळून गेल्याने त्यांना फरार घोषीत करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ दिली. यावेळी पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर देखील उपस्थित होते.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक नितीन संखे, तुषार आरेकर, जवान मातेरा, जवान एडके व वाहन चालक अशोक चौधरी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. याबाबत पुढील तपास राज्य उत्पादक शुल्क विभागाचे पालघर निरीक्षक बाळासाहेब पाटील करीत आहेत.

First Published on: June 25, 2022 7:28 PM
Exit mobile version