Vasai News: डुकरांच्या खुराड्यांमुळे जलस्रोत दूषित

Vasai News: डुकरांच्या खुराड्यांमुळे जलस्रोत दूषित

वसई: वसई-विरार महापालिका प्रभाग समिती आय`च्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी बजावलेल्या नोटिसीला केराची टोपली दाखवत डुकरांची खुराडीसुरू ठेवल्याने शेजारील जलस्रोत दूषित होत आहेत. त्या माध्यमातून रोगराई पसरत असल्याने सरकारी जागेत अनधिकृतपणे सुरू असलेले हे डुक्कर पालनतात्काळ बंद करण्यात यावेअशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वसई-पापडी येथे महापालिकेची परवानगी न घेता खुराडी बांधली आहेत. सदर खुराड्यांत डुक्कर पालन सुरू केले आहे. या डुकरांची मूत्र व विष्ठा त्यांनी उघड्यावर सोडलेली आहे. याचे परिणाम म्हणून शेजारील जलस्रोत दूषित होत असूनत्यातून रोगराई पसरत असल्याची तक्रार गिरीज-टोकपाडा येथील आदिवासी विकास आघाडीचे अध्यक्ष प्रमोद गणेश भोईर यांनी एप्रिल 2024 रोजी वसई-विरार महापालिका प्रभाग समिती आय`च्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभाग समिती आय`चे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी तात्काळ नोटीस बजावून डुकरांची खुराडी बंद करण्याचे आदेश दिले होते. अन्यथाही डुकरांची खुराडी इतरत्र हलवून परिसरात स्वच्छता करून घ्यावी. तसे न केल्यास महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 331, 332, 333, 336, 337 व 338 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसा इशाराही दिला होता.

विशेष म्हणजे याच आशयाची नोटिस 18 एप्रिल 2024 रोजी पुन्हा बजावण्यात आली होती. इतकेच नाही तर गिरीज-टोकपाडा तलाठी यांनीही 26 मार्च 2024 रोजी या जागेचा ग्रामस्थांसमक्ष पंचनामा केला होता. या डुक्कर पालनामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यासोबत या ठिकाणचे मलमूत्र शेजारील वस्तीत शिरून ग्रामस्थांना रोगराईला सामोरे जावे लागू शकतेअशी शक्यता त्यात व्यक्त करण्यात आली होती. डुकरांची खुराडी बांधलेली जागा सर्वेक्षणात सरकारी ( सर्व्हे क्रमांक : 6620) असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा दावा भोईर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

०००

डुक्कर पालनाकरता नाल्यापासून केवळ 50 फूट जागा सोडण्यात आली आहे. त्यातून निघणारे सांडपाणी नाल्यात सोडण्यात येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे टोकपाडा ग्रामस्थांचे आरोग्याला धोका संभवत आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात यावे. तसेच टोकपाडा ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात.

— प्रमोद गणेश भोईरतक्रारदार

First Published on: May 5, 2024 7:01 PM
Exit mobile version