Dahanu Accident: मुंबई -अहमदाबाद महामार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात

Dahanu Accident: मुंबई -अहमदाबाद महामार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात

डहाणू: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना येथे दुधाचा टँकर पलटून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर दुधाचा सडा पसरला. आज गुरूवारी साधारण १२.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी एन एच आय अ‍ॅम्बुलन्सने कासा रुग्णालयात रवाना करण्यात आला. कासा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी पुढील कार्यवाही करीत आहेत. अपघातातील अपघातग्रस्त वाहन एन एच आय क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

गुजरातवरून दुधाचा टँकर क्रमांक हा मुंबईच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याने तो गुजरात मार्गिकेवर कोसळला.त्यामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. सध्या महामार्गावर व्हाइट टॅपिंग सिमेंट काँक्रिट करण्याचे काम सुरू आहे. काम चालू झाल्यापासून तर आतापर्यंत अपघातात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. तसेच कामाचा निकृष्ट दर्जा दिसून येत आहे . काही ठिकाणी आतापासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी काँक्रिट केलेल्या कामात भेगा , तडा गेल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली नसून एका बाजूने काम चालू आहे. तर दुसर्‍या बाजूला काम झालेल्या भागातून टाकलेल्या स्टील सळया या अस्ताव्यस्त बाहेर आलेल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा बांधलेली सिमेंट सुरक्षा भिंत ही आताच तडा जाऊन तुटत असल्याचे चित्र सुद्धा समोर आले आहे . एकूणच बघायला गेले तर व्हाइट टॅपिंग सिमेंट काँक्रिट करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. त्यातच दळणवळणाची अपुरी पर्यायी व्यवस्था त्यामुळे या सारखे मोठ मोठे अपघात हे सातत्याने होत आहेत.

First Published on: April 25, 2024 9:34 PM
Exit mobile version