Dahanu Mahalaxmi yatra:यात्रेनिमित्त दुसरी नियोजन आढावा बैठक संपन्न

Dahanu Mahalaxmi yatra:यात्रेनिमित्त दुसरी नियोजन आढावा बैठक संपन्न

डहाणू: डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेची यात्रा २३ एप्रिलला सुरु होणार आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात डहाणू गट विकास अधिकारी हेमंत गरीबे, नामदेव बंडगर कासा पोलीस अधिकारी, संतोष देशमुख अध्यक्ष महालक्ष्मी मंदीर ट्रस्ट यांच्या समवेत , ट्रस्ट तसेच दुकानदार यांची दुसरी आढावा बैठक आयोजित केली होती. दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली नाही. यामुळे आजच्या बैठकीत दोन दिवसात अतिक्रमण काढले नाही तर स्वतः जेसीबीच्या साहाय्याने हे अतिक्रमण काढण्याची कारवाई करेन,असे पोलीस अधिकारी नामदेव बंडगर यांनी सांगितले.

सलग १५ दिवस चालणारी ही जिल्हातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक गुजरात राज्यातील लाखो भाविक या निमित्ताने येथे येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा, यात पिण्याचे पाणी, शौचालय, पार्किंग,कायदा व सुव्यवस्था, चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या आढावा बैठकीत विचार विमर्श करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अजूनही ग्रामपंचायतीने येथील सर्व विहिरींची , बोअरवेलची स्वच्छता करावी. कचरा, शौचालय, पिण्याचे पाणी आदी सुविधाची व्यवस्था कशी होणार, या बाबतीत ग्रामविकास अधिकार्‍यांनी नियोजन केले की नाही याची माहिती घेतली गेली. ग्रामपंचायतीकडून मंदिर व यात्रा परिसरात साफसफाई करावी व पाणी सुविधेसाठी कामगारांची व्यवस्था करण्यावरही भर द्यावा, कामगारांना ड्रेस कोड द्यावा तसेच त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावे,अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

First Published on: April 12, 2024 10:19 PM
Exit mobile version