रोजच्या वाहतूककोंडीने डहाणूकर त्रस्त

रोजच्या वाहतूककोंडीने डहाणूकर त्रस्त

डहाणू : कुणाल लाडे, डहाणू शहरात, सेंट मेरी हायस्कूल ते डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे शाळा सुटल्यावर तसेच रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत असतो. त्यातूनच शाळेतील लहान मुलांना, तसेच नागरिकांना वाट काढावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षितेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. डहाणू नगरपरिषद हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीचे प्रश्न गंभीर झाला आहे. येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकारी तसेच अनेक उपविभागीय अधिकार्‍यांनी ( प्रांत ) अनेक बैठका घेऊन निर्णय घेण्यात आले. परंतु, नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याने शहरातील पादचारी तसेच वाहन चालकांना मुकाट्याने त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. ७५ हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहर हे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी ग्रामस्थ येथे येत असतात. परंतु, सेंट मेरी हायस्कूल, मसोली, सागर नाका, रेल्वे स्टेशन, येथे रोजची वाहतूक जाम असल्याचे दिसून येते. बाजारपेठेत येणारे नागरिक कुठेही वाहन पार्किंग करून शहरात फिरत असतात.

स्थिती पुन्हा जैसे थे

रेल्वे स्टेशन ते सागर नाकापर्यंत रस्त्याच्या मधोमध काही खाजगी वाहने पार्किंग होत असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी डहाणू नगरपरिषद तसेच पोलिसांना सूचना देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवस त्या आदेशाची अंमलबजावणी झाली. परंतु पुन्हा जैसे थे झाल्याने या शहरात येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांना तसेच बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी येणार्‍या लोकांची प्रचंड गैरसोय होत असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा फल फ्रूट, कडधान्य, भाजीपाल्यांच्या हातगाड्या लागलेले असल्याने अधिकच त्रास जाणवते. तर रहदारी ना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची वेळ आली आहे. डहाणूतील वाहतूक कोंडीबाबत नगरपरिषद प्रशासन किंवा पोलीस कोणती उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

First Published on: September 29, 2022 9:14 PM
Exit mobile version