उधवा शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

उधवा शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

डहाणू: आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविल्या जाणार्‍या शासकीय आश्रमशाळा उधवा कासपाडा येथे इयत्ता 7 वीत शिकत असलेल्या एका 13 वर्षीय आदिवासी मुलीचा मृत्यू झाला. शाळेच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. शासकीय आश्रमशाळा उधवा कासपाडा येथे इयत्ता 7 वीत शिकणार्‍या मिताली सुरेश चौधरी (वय 13 वर्ष , राहणार उधवा केवडीपाडा) हिची बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तिची अचानक तब्बेत बिघडल्याने तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र उधवा येथे दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार केले पण प्रकृती गंभीर असल्याने तिला केंद्राच्या रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी खानवेल येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. मितालीच्या मृत्यूने आश्रमशाळेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अजून किती बळी गेल्यावर आश्रमशाळाचा कारभार सुधारणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

मितालीला ताप येत असल्याने मंगळवारी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांना तिला असलेल्या शिकलसेल आजाराविषयीं कोणतीही कल्पना दिली नाही. तिच्या आजाराविषयीची कल्पना डॉक्टरांना दिली असती तर तिच्यावर वेळीच योग्य ते उपचार केले गेले असते तर मुलीचा जीव वाचला असता. शिक्षकांनी मुलगी आजारी असल्याची माहिती पालकांना देऊन तिला वेळीच रुग्णालयात दाखल करावयास पाहिजे होते. तसेच तिच्या पालकांनाही याबाबतची माहिती देणे गरजेचे असताना शाळेच्या मुख्याध्यापक तसेच अधीक्षकांनी तसे काहीही केले नसल्याने मितालीचा मृत्यू झाला. त्यास आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

मुलीला पहाटे पाचच्या दरम्यान आरोग्य केंद्रात आणले. पण तब्बेत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका देऊन खानवेलला पाठविले. तिच्या शिकलसेल आजाराची कल्पना दिली असती तर वेळीच योग्य ते उपचार करता आले असते.
– डॉ. रितेश पटेल, आरोग्य अधिकारी

First Published on: October 6, 2022 9:32 PM
Exit mobile version