तनिष्काप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी

तनिष्काप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी

वसईः महावितरणने नियमबाह्य केलेले काम आणि वसई विरार महापालिकेने त्या कामाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे तनिष्का कांबळे हिचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महावितरण व महापालिका यांनी केलेल्या सर्व कामांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केली असून तनिष्का कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला नाही तर महावितरण व महापालिका यांनी तिचा केलेला हा खून आहे, असा थेट आरोपही भट यांनी केला आहे.

वसईविरार महापालिका क्षेत्रात महावितरणने अशाच प्रकारे अनेक कामे केलेली आहेत. भविष्यात ती वसईविरारकरांच्या जीवावर बेतणार आहेत. त्यामुळे या कामांचीही चौकशी करण्यात यावी, अशी चरण भट यांची मागणी आहे. विरार पश्चिमबोळींज येथील मथुरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारी तनिष्का कांबळे (15) ही विद्यार्थीनी 16 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातीलच ज्ञान सागर या शिकवणीकरता घरातून निघाली होती. त्यावेळी पावसामुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने तनिष्काला विजेचा धक्का बसला होता व त्यात तिचा मृत्यू झाला होता. तनिष्काच्या शवविच्छेदन अहवालातही विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. मात्र पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेतलेला नव्हता.

विद्युत निरीक्षकांच्या चौकशी अहवालानंतरच दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका अर्नाळा पोलिसांनी घेतली होती.दरम्यानच्या काळात तनिष्काच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देतानाच दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला होता. मात्र अर्नाळा पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते. विद्युत निरीक्षकांनीही तातडीची मदत देण्याचे निर्देश महावितरणला दिले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने चौकशी अहवालाला उशीर होणार असल्याची माहिती विद्युत निरीक्षकांनी दिली होती. या दिरंगाईमुळे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिकांनी विद्युत निरीक्षक व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते.वाढत्या जनआक्रोशानंतर अर्नाळा पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी भारतीय दंड संहिता 304 अ व 34 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र यात दोषींच्या नावांचा उल्लेख नसल्याने आता विद्युत निरीक्षकांच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: September 7, 2022 9:19 PM
Exit mobile version