शिरीषपाडा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी

शिरीषपाडा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी

वाडा : अघई रोडवर असलेल्या शिरीषपाडा नाका येथे सरकारी जागेवर व्यापार्‍यांनी अक्षरशः डल्ला मारलेला पाहायला मिळत असून याकडे अनेकदा तक्रारी करूनही महसूल विभाग डोळ्यांवर हात घेऊन बसल्याचा आरोप केला जात आहे. लोकांच्या तक्रारी व वरिष्ठांचे आदेश पाळून महसूल विभागाने तातडीने याबाबत धडक कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा तक्रारदार उज्ज्वला डुकले यांनी दिला आहे.

महसूल विभागाने कोने ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिरीषपाडा नाका येथील जागा येथील काही आदिवासी कुटुंबांना मिळकत म्हणून देऊ केली होती. महसूल विभागाच्या तत्कालीन अधिकार्‍यांशी व्यापार्‍यांनी गोडीगुलाबी करून या सरकारी जमिनींवर आपली दुकाने उभारली. आता या ठिकाणी अनेक दुकाने व घरे उभी राहिली असून रातोरात नवीन दुकाने उभारण्याची जणू स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळते. आदिवासींना नवीन शर्तीने लागवडीस दिलेल्या या जमिनींवर आता अनधिकृत बांधकामाचे पीक फोफावत असून तक्रारदारांना व्यापारी धमक्या देतात असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार तक्रारी व वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करूनही गोरगरीब आदिवासींच्या या तक्रारींना महसूल विभाग केराची टोपली दाखवितात असा आरोप तक्रारदार उज्ज्वला डुकले यांनी केला आहे. याबाबत कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशालाही हरताळ फासलेला आहे असे तक्रारदार सांगत असून महसूल विभागाच्या जागेवरील ही अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त असून जागा मूळ मालकांना देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.याबाबत पंचनामे केले असून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. महसुल विभाग ही अतिक्रमणे काढण्याबाबत लवकरच ठोस निर्णय घेईल, असे तलाठी दत्ता डोईफोडे यांनी सांगितले. तर मार्च संपताच होणार्‍या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल व तातडीने अनधिकृत बांधकामे हटविण्यात येतील, असे मत नायब तहसीलदार सुनिल लहांगे यांनी व्यक्त केले आहे.

First Published on: March 30, 2023 10:01 PM
Exit mobile version