आली दिवाळी ! शिरगाव किल्ल्याला मिळाली नवी झळाळी

आली दिवाळी ! शिरगाव किल्ल्याला मिळाली नवी झळाळी

पालघर : छेदीसिंह ठाकूर आश्रमशाळा साखरे वाणगाव येथील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी स्वराज्य प्रतिष्ठानसोबत शिरगाव किल्ल्याची (कोट ) साफसफाई करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करत स्वच्छतेचा संदेश दिला. या साफसफाई मोहिमेमुळे शिरगाव किल्ल्याने बर्‍याच दिवसानंतर मोकळा श्वास घेतला. तटबंदी, अंतर्गत वास्तू, बुरुज, समाधी वृंदावन, विविध सैनिक दालने, मुख्य प्रवेशद्वार इत्यादीवर वाढलेली व किल्ल्यास धोकादायक असणारी काटेरी अनावश्यक झुडुपे स्वच्छ केली. किल्ल्यावर बेसुमार जमा झालेली झाडी, गवत, काटेरी झुडुपे साफ करण्यास तब्बल नऊ तास लागले.
राज्य पुरातत्व विभाग मुंबई अंतर्गत असणारा हा कोट गेली अनेक वर्षे स्थानिक दुर्गमित्र संघटना अत्यंत जबाबदारीने संवर्धन मोहिमा आयोजित करून जपत आहेत. स्वराज्य प्रतिष्ठान अनेक अत्यंत नियोजनपूर्वक सदर मोहिमेचे नियोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे तुषार पाटील, राहुल राऊत, निखिल मोरे, अक्षय पाटील, परेश गावड, मनीष पाटील, अक्षय किणी रामदास, बोलाडा, नितीन राजड, कमल हाडळ यांनी योगदान दिले. दुर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे या जाणिवेने सदर महाश्रमदान मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक योगदानाने आम्हाला नवी ऊर्जा प्राप्त झाली, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले.

First Published on: October 23, 2022 9:07 PM
Exit mobile version