बोईसरमध्ये मनसे विरूद्ध डॉक्टर संघर्ष टोकाला

बोईसरमध्ये मनसे विरूद्ध डॉक्टर संघर्ष टोकाला

सचिन पाटील,बोईसर : बोईसरमधील डॉक्टर स्वप्निल शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि डॉक्टर शिंदे असा वाद चिघळणार आहे . बोईसर पोलिसांनी ३०७ सह विविध कलमाअंतर्गत पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या साथीदारांना अटक केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. बोईसर शहरातील शिंदे हॉस्पिटलच्या डॉक्टरला मारहाण प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षा विरोधात डॉक्टरकी पेशाचा लाभ घेऊन खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवून लावलेली गंभीर कलमे मागे घेणे,कोविड काळात रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार आणि ग्रामपंचायतीचा खोटा दाखला बनवणार्‍या डॉक्टर स्वप्नील शिंदे यांच्यावर कारवाईसाठी मनसेकडून बोईसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंगळवारी दुपारी बोईसरच्या सरोवर हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. मोर्चाला मुंबई, ठाणे आणि पालघरचे नेते आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरकी पेशाचा गैरफायदा आणि अन्य डॉक्टरांची मदत घेऊन गंभीर दुखापत झाल्याची खोटी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप जाधव यांनी केला. प्लास्टिकच्या खुर्चीने जीवे ठार मारण्यात प्रयत्न कसा होऊ शकतो असा सवाल उपस्थित करीत समीर मोरे यांच्या विरोधात लावलेल्या कालमांबाबत केला. समीर मोरे यांना अडकण्यासाठी डॉ शिंदे यांनी बोईसर पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना त्यांचा जमिनी आणि दागिने विकून बिले भरावी लागत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी त्यांच्या कडे केल्याची माहिती दिली.हृदय विकाराच्या उपचारासाठी ४० हजार रुपये हॉस्पिटलचे बिल तर औषधांच्या बिलापोटी ८० हजार रुपये घेतल्याप्रकरणी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.आज शांत बसलो तर येत्या काळात माझ्यासह सर्वांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने बोईसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.रुग्णांची लुटमार करणार्‍या महागड्या शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचार न घेण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केले.

First Published on: January 24, 2023 9:03 PM
Exit mobile version