दसरा आला, झेंडूंचा भाव वाढला

दसरा आला, झेंडूंचा भाव वाढला

डहाणू: विजयादशमी (दसरा) निमित्त पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या होत्या. डहाणू तालुक्यात देखील उत्सवाची मोठी तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. डहाणू, आशागड, गंजाड, चारोटी, महालक्ष्मी मंदिर परिसर, कासा, सायवन गावांतील बाजारपेठा झेंडू, शेवंती या प्रमुख फुलांबरोबर विविध फुलांनी गजबजल्या होत्या. विविध भागांतून गेल्या दोन दिवसांपासून झेंडू आणि शेवंतीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. दसर्‍यानिमित्त झेंडूच्या फुलांचा मोठा मान असून, फुलांची मागणी वाढल्याने दरात देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सध्या नवरात्रौत्सव सुरू असल्यामुळे झेंडू आणि शेवंती या प्रमुख फुलांना प्रति किलोला अनुक्रमे 100 ते 150 रुपये दर सुरू आहे. तर दसर्‍याच्या दिवशी ह्या किमतीत किंचित वाढ होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

यावर्षी नवरात्र आणि दिवाळीचे नियोजन करूनअनेक शेतकर्‍यांनी भगवा आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली आहे. नवरात्री उत्सव सुरू असून सध्या फुलांची मागणी जास्त आहे. घटस्थापनेपासून ते दसर्‍याच्या निमित्ताने झेंडू फुलाच्या मागणीत मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यावसायिक हॉटेल, दुकान, घरगुती पुजे साठी, वाहनावर लावण्या साठीचा मान झेंडूच्या फुलांना दिला जातो. त्याच बरोबर अनेक ठिकाणी झेंडूच्या फुलांच्या माळा, भाताची कणसे देखील विकण्यासाठी ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्यावर्षी फुलाची मागणी वाढली असून योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकरी, बागायतदार देखील सुखावले आहेत.

First Published on: October 4, 2022 9:48 PM
Exit mobile version