बहु आयामी जांभूळ बाजारात दाखल

बहु आयामी जांभूळ बाजारात दाखल

जव्हार: जव्हार तालुक्यातील जंगल परिसरात फळ झाडे, वेली, फुले,कंदमुळे अशी अनेक प्रकारची झाडे उपलब्ध असून यामुळे येथील आदिवासी नागरिकांना या रान मेव्याचा आधार होत आहे. यात सध्या बहु आयामी जांभूळ बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली असून मधू मेही रुग्णांसाठी मेजवानी सुरू झाली आहे. तुरट, गोड चवीचे जांभूळ केवळ चवीसाठी नाही तर मानवी आरोग्यासाठी परिपूर्ण आहार मानले जाते. त्यात अनेक औषधी आणि आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातील पोषक जीवनसत्त्वांमुळे मानवी प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. जांभूळ खाल्ल्याने त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होते. वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्याच्या खाण्याने आराम मिळू शकते. तर त्यातील झिंक आणि व्हिटॅमिन सी मुळे खोकला, श्वसनाच्या इतर गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.

तसेच जांभूळ दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ते ज्यूस, व्हिनेगर, गोळ्या, कॅप्सूल आणि चूर्ण यांसारख्या इतर प्रकारांतूनही सेवन केले जाते. त्यात विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या उत्पादनांचा व्यवसायही वाढला आहे.उन्हाळ्यात आंब्यानंतर येणार्‍या जांभूळ फळाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. विविध पोषक तत्व असलेले हे फळ मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेही रुग्णांसाठी अधिक लाभदायी मानले जाणारे हे फळ मुबलक प्रमाणातील पोटॅशियममुळे स्ट्रोक, उच्च रक्तदाब टाळण्यासाठी मदत करणारे, तर भरपूर प्रमाणातील अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देणार्‍या रॅडिकल पेशींविरुद्ध काम करणारे मानले जाते.

First Published on: April 19, 2024 9:43 PM
Exit mobile version