युरीयाचा काळाबाजार रोखण्यास कृषी विभागाला अपयश

युरीयाचा काळाबाजार रोखण्यास कृषी विभागाला अपयश

सचिन पाटील, बोईसर :  पालघर भिवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत युरीया खताचा सुमारे १०० टन साठा जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.दोन महिन्यातील या सलग दुसर्‍या कारवाई ने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हक्काचा अनुदानीत निम कोटेड युरीया खताचा सातत्याने होणारा काळाबाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या गोरखधंद्यात सामील संशयित हे पालघर जिल्ह्यातील असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनुदानीत युरीया खताच्या होणार्‍या काळाबाजाराच्या गोरखधंद्यात बोईसर परिसरातील काही व्यक्ती सक्रीय असल्याचे नेहमीच आरोप होत आहेत.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड,वाडा आणि डहाणू तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांच्या नावाने खरेदी केलेला हजारो टन अनुदानीत निम कोटेड युरीया प्रत्यक्षात शेतकर्‍यांना वाटप न होता गोदामांमध्ये त्याच्या गोण्या आणि पॅकिंग बदलून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील काही टेक्सटाईल्स, केमिकल आणि फार्मा उद्योगांना बेकायदेशीरपणे पुरवठा केला जातो. उद्योगांना प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक टेक्निकल ग्रेडचा युरीया खताच्या ५० किलो गोणीची किंमत सरासरी ३ हजार रुपयांपर्यंत असून अनुदानीत युरीया खत कृषी सेवा केंद्रात मात्र फक्त २७० रुपयांना मिळते. या धंद्यात मोठा फायदा असल्याने बोईसर परिसरात अनेक युरीया माफीया तयार झाले असून काही कृषी सेवा केंद्र चालक, सर्वपक्षीय राजकीय नेते-पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरून महिन्याला हजारो टन युरीयाचा काळाबाजार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

यामध्ये तक्रारी प्राप्त झाल्यावर पालघर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्यामार्फत संशयीत कृषी सेवा केंद्रांची तपासणी, युरीयाची वाहतूक करणारी संशयीत गाडी पोलिसांनी पकडल्यावर युरीया साठ्याचा पंचनामा करून त्याचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवणे यासारखी कार्यवाही केली जाते. या धंद्यात वरपासून खालपर्यंत टोळी सक्रीय असल्याने फुटकळ लोकांवर थातुरमातूर कारवाई केली जाते. मात्र युरीयाच्या काळाबाजारातील प्रमुख माफीयांवर कारवाई करण्यास कृषी विभाग आत्तापर्यंत सपशेल अपयशी ठरले आहे.केंद्र सरकारने अनुदानीत युरीयाचा सातत्याने होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शेतीसाठी निम कोटेड युरीया बनविण्यास सुरुवात केली मात्र त्याचा देखील जास्त फायदा होताना दिसत नाही.

पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ऐन हंगामात पुरेशा प्रमाणात युरीया खत मिळत नाही. मात्र दुसरीकडे तारापूर एम.आय. डी. सी. मधील कारखान्यांना काळाबाजार करून युरीया पुरविला जातो. या सर्व प्रकाराला कृषी विभाग जबाबदार असून त्यांनी खताचा काळाबाजार करणार्‍या लोकांवर कठोर कारवाई करावी.
– अविनाश पाटील
जिल्हाध्यक्ष,कुणबी सेना पालघर

First Published on: January 19, 2023 9:37 PM
Exit mobile version