कारल्याच्या लागवडीतून शेतकर्‍यांचा दिवस गोड

कारल्याच्या लागवडीतून शेतकर्‍यांचा दिवस गोड

मनोर: पालघर तालुक्यातील अती दुर्गम भाग मानल्या जाणार्‍या सावरा, एम्बुर, एरम्बी भागात नगदी पीक असलेल्या कारल्याची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शंभर एकर क्षेत्रात कारल्याची लागवड करण्यात आली आहे.यंदा मान्सून लांबल्याने एक महिन्याच्या उशिराने लागवड करण्यात आली आहे. एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च तर हंगामात दोन टन कारली विक्रीतून एकरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कल कारली लागवडीकडे आहे.आंतर पीक म्हणून काकडी लागवड केली जात आहे.

शेतकर्‍यांना कारल्याच्या लागवड आणि प्रत्यक्ष कारल्याचे उत्पन्न मिळेपर्यंत काकडी विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून खर्चाला हातभार लागत आहे. पालघर तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या सावरे एम्बुर एरंबी आणि पाचूधारा भागात खरीप हंगामातील भात शेती नंतर रब्बी हंगामात नगदी पीक म्हणून कारल्याची लागवड केली जाते. सुरवातीला वीस ते तीस एकर लागवड असलेले क्षेत्र शंभर एकरापर्यंत पोहोचले आहे.लहान मोठे शेतकरी एकरापासून पाच एकरापर्यंतच्या भाडेपट्ट्यातील अथवा मालकीच्या शेतीत कारल्याची लागवड करतात.काही वर्षांपूर्वी या भागात उत्पादित कारल्याची परदेशात निर्यात केली जात होती.त्यानंतर शेतमालावरील निर्यात बंदी झाल्याने कारल्याची निर्यात बंद झाली आहे.खरिप हंगामात भात शेती आटोपल्यानंतर नगदी उत्पन्न देणारी कारल्याची शेती शेतकर्‍यांना लाभदायक ठरत असल्याने कारले लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कारल्याची शेती करताना हंगामाच्या शेवटी संपूर्ण खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती कारले लागवड करणारे शेतकरी प्रकाश दूतकर यांनी दिली.

First Published on: December 12, 2022 8:47 PM
Exit mobile version