जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना एमबीएमटी बसमधून मोफत प्रवास

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना एमबीएमटी बसमधून मोफत प्रवास

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाकडून ८ मार्च २०२४ जागतिक महिला दिनानिमित्त दिवसभर महिलांना महापालिकेच्या परिवहन बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मीरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाकडून शहरात व शहराबाहेर ठाणे, बोरीवलीपर्यंत प्रवासी बसेस चालवण्यात येत आहेत. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून मीरा- भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून दिवसभर महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्त संजय काटकर यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.महापालिका परिवहन विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त परिवहन सेवेच्या बसमधून महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येत आहे. ८ मार्च २०२१ रोजी ११ हजार ५५२ , ८ मार्च २०२२ रोजी २१ हजार ४६३ व ८ मार्च २०२३ रोजी २५ हजार ८३८ महिलांनी मीरा- भाईंदर महापालिकेच्या बसमधून मोफत प्रवास केला आहे. त्यामुळे यावर्षी देखील महिलांना आयुक्तांच्या निर्देशानुसार ८ मार्च रोजी महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसमधून महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आयुक्त संजय काटकर यांनी आवाहन केले आहे.

First Published on: March 6, 2024 9:55 PM
Exit mobile version