मरणानंतर ही मरणयातना, तलासरीमध्ये नदीतून अंत्ययात्रा

मरणानंतर ही मरणयातना, तलासरीमध्ये नदीतून अंत्ययात्रा

डहाणू : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. पालघर मधील आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणार्‍या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात स्मशानभूमी व रस्त्यांअभावी चक्क पाण्यातून प्रेतयात्रा काढून नदीकाठी उघड्यावर अंत्यविधी पार पडल्याची घटना समोर आली आहे. ह्या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ गृपग्रामपंचायात अंतर्गत बोरमाळ गावातील भेंडीपाडा येथील एका व्यक्तीला मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागल्याची घटना पाहायला मिळाली आहे. भेंडीपाडा येथील नागरिकांना स्मशानभूमी मध्ये जाण्यासाठी नदीतून उतरून जावे लागल्याने विदारक दृश्य पहावे लागले आहे.
आदिवासीमंत्री विजयकुमार गावित पालघरच्या दौर्‍यावर असतानाच तलासरी तालुक्यातील बोरमाळ येथे नदीतून प्रेतयात्रा न्यावी लागल्याची घटना समोर आली आहे. तर नदीतून प्रेतयात्रा काढली असून नदीशेजारीवरच उघड्यावर अंत्यविधी उराकावा लागल्याचे विदारक दृश्य पहावे लागले आहे.

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागांमधील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. सध्या अधिवेशन सुरू असून अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा मर्कटवाडीच्या घटना उचलून धरली होती. त्यांनतर आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी तत्काळ पालघर जिल्ह्याचा दौरा करून ग्रामीण भागातील रस्ते आणि मूलभूत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता तरी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांना सुविधा मिळतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

First Published on: August 22, 2022 8:11 PM
Exit mobile version