Ram Naik News: राजकीय सौहार्दता घोन्सालवीस यांनी अखेरपर्यंत जपली

Ram Naik News: राजकीय सौहार्दता घोन्सालवीस यांनी अखेरपर्यंत जपली

वसईः सार्वजनिक जीवनात विरोधी पक्षीय किंवा भिन्न विचारांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय ठेवणे. परस्परात वैचारिक देवाण-घेवाण करणे ही राजकीय सौहार्दता लोकशाहीचा मूलमंत्र असून, तो स्व. डॉमणिक घोन्सालवीस यांनी अखेरपर्यंत जपला, असे प्रतिपादन माजी राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना व्यक्त केल्या. वसईचे माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस यांच्या झालेल्या निधनाबद्दल, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सांडोर चर्चच्या प्रांगणात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राम नाईक अध्यक्षस्थानी होते. विधानसभेत आम्ही एकत्र काम केलेले होते. काही सारख्या प्रश्नांवर आम्ही एकत्रित आवाज उठवला होता. मी रेल्वेमंत्री असताना पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेन डहाणूपर्यंत नेण्याच्या प्रश्नावर घोन्सालवीस यांनीही सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या जाण्याने सहकार व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

आमच्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी सुखदुःखात त्यांचा फोन यायचा. सार्वजनिक स्तरावरील काम ते हक्काने सांगायचे. वसईच्या सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला अनेक वर्ष प्रेरणा देत राहणार आहे. त्यांच्या जाण्याने एका ज्येष्ठ मार्गदर्शकास आपण मुकलो आहोत, अशा शब्दात खासदार राजेंद्र गावीत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, बॅसिन कॅथॉलिक बँकेचे अध्यक्ष बेनॉल्ड डायस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा, साधना पतपेढीचे अशोक कुलासो, स्व. घोन्सालवीस यांचे पुत्र युरी व रोहन घोन्सालवीस यांची श्रद्धांजलीपर भाषणे यावेळी झाली. सांडोर चर्चचे धर्मगुरू रेमंड रुमाव यांच्या प्रार्थनेने शोकसभेचा समारोप झाला.

First Published on: April 16, 2024 10:04 PM
Exit mobile version