पास व्हायचे असेल तर मला हवे ते दे, प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

पास व्हायचे असेल तर मला हवे ते दे, प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

डहाणूः एमबीबीएसच्या परीक्षेत पास व्हायचे असेल तर हवे ते दे, असे सांगून विद्यार्थानीकडे शरीरसुखाची मागणी करत छेड काढणार्‍या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाविरोधात कासा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. मूळची नागरपूरची असलेली पिडीत विद्यार्थीनी वेदांता मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्गात शिकत असून ती कॉलेजच्या वसतीगृहात राहत होती. ती बायोकेमिस्ट्रीच्या विषयात नापास झाल्याने २ एप्रिलला एका अज्ञात इसमाने फोन करून पूनर्मूलांकनासाठी प्राध्यापकाला भेटण्यास सांगितले होते. त्यानुसार पिडीत विद्यार्थीनी प्राध्यापकाला भेटायला गेली असता त्यांनी पास व्हायचे असेल तर मला हवे ते दे, असे सांगत शरीरसुखाची मागणी केली.

यापूर्वी याच शिक्षकाने अशाच पद्धतीने या तरुणीची फोनवरून आणि प्रत्यक्ष छेड काढली होती. त्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने कॉलेज प्रशासनाकडे लेखी तक्रार देखील केली होती. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पीडित विद्यार्थिनीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिच्या फिर्यादीनंतर कासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 च्या 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्राध्यापकाला निलंबित करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. प्राध्यापकाला तात्काळ अटक करण्यात आली. तसेच अन्य विद्यार्थीनींसोबत असा प्रकार घडला आहे का याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ चौधरी यांनी केली आहे. दरम्यान, आपणावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून त्यादिवशी मी मुंबईत होतो. कॉलेजमध्ये हजर नव्हतो. पोलीस तपासात या गोष्टी समोर येतील, असे आरोपी प्राध्यापकाचे म्हणणे आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना निवेदन ही देण्यात आले.पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून मागणी करण्यात आली की पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजीत करून त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून द्यावी. त्याच प्रमाणे सदर महाविद्यालयाने आरोपी प्राध्यापकास निलंबित केले नाहीये, तरी मनविसेच्या वतीने सदर महाविद्यालयास देखील सात दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी मनविसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अ‍ॅड. सायली सोनवणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष भावेश चुरी, महिला जिल्हाध्यक्षा प्रीती मोरे, मनविसे जिल्हा संघटक ज्ञानेश पाटील, मनसे उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव, मनविसेचे उपजिल्हा अध्यक्ष विजय गांगुर्डे, तालुका अध्यक्ष अ‍ॅड. उदय अधिकारी, डहाणू तालुका अध्यक्ष सागर शर्मा, सत्यम मिश्रा, अश्विनी पाटील इत्यादी उपस्थित होते.

First Published on: May 31, 2023 9:48 PM
Exit mobile version