तांदूळ चक्कीवाल्यांची आता मीटर तपासणी नक्की

तांदूळ चक्कीवाल्यांची आता मीटर तपासणी नक्की

वाडा : शासकीय धान भरडाईतील घोटाळ्याला प्रतिबंध लावण्यासाठी आता ज्या राईस मिलसॉशी शासकीय धान भरडाईचा करार केला आहे. त्या राईस मिलर्सला (तांदूळ चक्की मालक ) धानाची भरडाईसाठी उचल केल्यानंतर विद्युत मीटरची रीडिंग द्यावी लागणार आहे. यासंबंधीचे पत्र शासनाने राईस मिलर्सला बजावले आहे. आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमी भवाने धान खरेदी केले जाते. यानंतर शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्स सह करार करून भरडाई केली जाते. त्यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मागील तीन-चार वर्षांपासून राईस मिलर्स धान्य खरेदी केंद्रावरून धानाची उचल केल्यानंतर त्याची भरडाई न करताच बाहेरील तांदूळ घेऊन शासकीय गोदामात जमा करीत होते. काही जिल्ह्यात राईस मिलर्सने निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात जमा केल्याचे प्रकार पुढे आल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत.

धान भरडाईतील घोळाला पाय बंद लागावा यासाठी शासनाने आता ज्या राईस मिलसॅ सह धान भरडाईचा करार केला आहे. त्यांना भरडाई पूर्वीची आणि भरडाई नंतरची राईस मिलच्या विद्युत मीटरची रिडींग पाठविणे अनिर्वाय केले आहे. राईस मिलची विद्युत मीटर रिडींग घेण्यासाठी एक पथक सुद्धा तयार केले आहे. हे पथक राईस मिलमध्ये जाऊन रीडिंग घेऊन उचल केलेल्या धानाची राईस मिलमध्ये भरडाई झाली का याची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे. यासंबंधीचे पत्र सुद्धा दिल्याची माहिती आहे.

बॉक्स

असा केला जात होता घोळ
शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल केल्यानंतर त्या धानाची भरडाई न करता ते धान परस्पर विक्री केले जात होते. तर बाजारपेठेतून रेशनचा तांदूळ खरेदी करून अथवा उत्तर प्रदेश सह इतर राज्यातून तांदूळ आणून तो शासकीय गोदामात जमा केला जात होता. यामुळे राईस मिलरचे मिलिंगचे पैसे, विज बिलवरील खर्च, वाहतूक भाडे यात मोठी बचत होत होती. पण, हा घोळ पुढे आल्यानंतर आता प्रशासनाने कारवाईसाठी पावले उचलली आहेत.

First Published on: September 26, 2023 8:07 PM
Exit mobile version