रमाबाई नगरच्या ४०० कुटुंबांना हक्काचे घर

रमाबाई नगरच्या ४०० कुटुंबांना हक्काचे घर

वसईःवसई रोड परिसरातील आनंद नगर मागील माता रमाबाई नगर येथील आर्थिक दुर्बल घटकातील चारशे कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. या कुटुंबांना बेघर करून, हुसकावून लावण्याच्या विकासकाच्या प्रयत्नास न्यायालयीन लढ्याद्वारे हाणून पाडण्यात यश आले आहे. या गरीब कुटुंबांची न्यायालयात भक्कम बाजू मांडणार्‍या वसईतील वकील साधना धुरी यांनी न्यायालयाकडून मनाई हुकुम मिळवल्यामुळे विकासक वाटाघाटी करून, सर्वांना मोफत घरे बांधून देण्यास तयार झाला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचे साधना धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

२०१२ रोजी वसई कोर्टात तीन दिवाणी दावे दाखल झाले होते. ज्यात माता रमाबाई नगरच्या जागा मालक आदित्य डेव्हलपर्सने तिथे वस्ती करून राहात असलेल्या गरीब आणि आर्थिक दुर्बल चारशे कुटुंबांच्या झोपड्या तोडून त्यांना बेघर करुन जमिनीचा मोकळा कब्जा मागितला होता. या गरीब लोकांपैकी कित्येकांकडे स्वतःचे रेशन कार्ड देखील नव्हते. श्रीमंत विकासकासोबत न्यायलयीन लढाईसाठी पुरेसा पैसाही नव्हता. होता केवळ अनेक वर्षांचा जागेवरील कब्जा. अशा प्रतिकूल प्रकरणांत सामाजिक भावनेने पूर्ण लक्ष घालून, त्यांची केस वसईतील वकील अ‍ॅड. साधना धुरी यांनी निकराने लढली. आमिष, प्रलोभनाला थारा न देता गुणवत्तेच्या जोरावर हा खटला लढला गेला. अखेर या लढ्यास यश मिळून, माता रमाबाई नगरच्या आर्थिक दुर्बल घटकातील चारशे कुटुंबाना हुसकावून लावण्यापासून कोर्टातून मनाई हुकुम मिळवला आहे. त्यामुळे आता जमिन मालक त्यांना घरे बांधून देण्यास तयार झाला असून, मालकाशी वाटाघाटी करून एक पैसाही न देता त्यांना मोफत घरे मिळतील, या अटीवर समझोता झाला आहे. या प्रकल्पात एक १६ मजली इमारत आहे. ज्यात चारशे सेल्फकंटेन्ड प्लॅटस् आणि वस्तीवाल्यांसाठी एक मंदिर असणार आहे. शिवाय एक उद्यान व लहान मुलींसाठी एक बालवाडीची तरतूद आहे. त्या प्रकल्पाचे भुमीपूजन या केसेस सुरूवातीपासून चालवून वस्तीवाल्यांना मोफत घरे मिळवून देण्यात अग्रणी भूमिका बजावणार्‍या अ‍ॅड. साधना धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदित्य डेव्हलपर्सचे भागीदार बिनल कोरडिया आणि दत्ता नर, माता रमाबाई ट्रस्टचे अध्यक्ष उमेश शेट्टी आणि इतर पदाधिकार उपस्थित होते.

First Published on: February 22, 2024 10:36 PM
Exit mobile version