बळीराजा शेतीच्या कामाला; आधुनिक श्री भात शेतीवर भर

बळीराजा शेतीच्या कामाला; आधुनिक श्री भात शेतीवर भर

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यात यंदा सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मागे झालेल्या तौक्ते चक्रीवादळात जिल्ह्यात पावसाने चार-पाच दिवस लागोपाठ दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेत जमिनीला चांगला ओलावा पकडला असून रोपांच्या लागवडीसाठी पूरक जमीन तयार झाली आहे. काही ठिकाणी पाऊस मुबलक झाल्याने तेथील शेतकऱ्यांनी लागवडीची कामे हाती घेत वरई,नागली,नाचणी यांची लावणी केली आहे. यंदा शेतकरी श्री भात शेती पद्धतीवर भर देताना दिसत आहेत.

जव्हारच्या पिंपळशेत, कोगदा, देहरे, वडोली, अशा काही भागात भात पिक जास्त प्रमाणात घेतले जाते.त्या भागात शेतीविषयी कार्यरत असलेल्या उमेद अभियान व रुरल कम्यूस स्वयंसेवी संस्थांकडून शेतकऱ्यांना भात लागवडीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये श्री भात लागवड ही आधुनिक भात लागवडीची पद्धत याभागात अवलंबली जात आहे. ही पद्धत वापरुन शेतकऱ्यांना भात पिक भरघोस प्रमाणात काढता येते. अल्पभुधारक, कमी शेतजमीन असलेले शेतकरी ही श्री भात लागवडीची पध्दत वापरुन कमी खर्च व जास्त उत्पन्न काढु शकतो, असे कृषी तज्ञांचे मत आहे.

भात लागवडीच्या श्री भात लागवड पध्दतीत शेतकरी जमिनीत पहिल्यांदा चिखल करुन घेतो.त्यानंतर दोरीच्या साहाय्याने २५ बाय २५ सेमी अंतराने भाताच्या रोपांच्या एक एक काड्या जमिनीत दोन ते तीन इंच आत लावल्या जातात. अशाप्रकारे भात लावणी केली जाते. श्री भात लागवड पध्दतीने भाताच्या रोपांची वाढ जोमाने होऊन रोपाला फुटावा चांगला मिळतो. त्यामुळे भाताच्या लोंब्या चांगल्या येतात.पारंपारिक भात लागवडीपेक्षा या एसआरआय पद्धतीत शेतकऱ्यांना भाताच्या धान्याचे उत्पादन जास्त काढता येत असल्याने पिंपळशेत खरोंडा भागात शेतकऱ्यांकडून या पद्धतीने भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.

जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांची बहुतेक शेत जमीन डोंगर उतारावर असल्याने तेथे पाणी साचून राहत नाही. अशा जमिनीत शेतकऱ्यांकडुन वरई, नागली, खुरासणी, तुर अशी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाणथळ भागात आहेत. तिथे पावसाचे पाणी साचले जाते. अशा जमिनीत ओलावा, सुपिकता जास्त असल्याने तिथे भात लागवड प्रामुख्याने केली जाते. उष्ण व दमट हवामान भात पिकाला पोषक असते. पुरेसा पाऊस झाल्यावर शेताच्या वाफ्यात भाताची रोपे तयार करुन घेतली जातात. नंतर ती भाताची रोपे शेतजमिनीत मुबलक पाणी असल्यावर चिखल करुन ही रोपे लावली जातात. आज भात लावणीच्या वेगवेगळ्या पध्दती जिल्ह्यात पाहायला मिळतात.

जव्हार, मोखाडा तालुक्यात बहुतेक शेतकरी पारंपारिक पद्धतीने भात लावणी करताना दिसतो. शेतजमिनीत दमदार पाऊस झाल्यावर भात लावणीला खरी सुरुवात होते. भात लावणीसाठी शेतात चिखल करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते.जर शेतात पाणी नसेल तर पाणी सोडले जाते. जेणेकरुन चिखल चांगला व्हावा. काही ठिकाणी बैलांच्या साहाय्याने चिखल केला जातो. परंतु आजच्या आधुनिक युगात टँक्टरद्वारे, यंत्राने शेतात पाणी नसल्यास पाणी सोडून चिखल तयार केला जातो. त्यानंतर भाताच्या रोपांची लावणी केली जाते.

हेही वाचा –

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प; भाजपच्या विरोधामुळे ‘मिठाचा खडा’

First Published on: June 29, 2021 11:59 PM
Exit mobile version