पालघर जिल्हा परिषदेत शिंदे गटाचीच सत्ता

पालघर जिल्हा परिषदेत शिंदे गटाचीच सत्ता

पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सत्ता काबिज करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. त्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेने बाजी मारत सर्वच्या सर्व 20 जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे वळवले आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेवर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची सत्ता बुधवारी येणार हे निश्चित झाले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बुधवारी निवडणूक होत आहे. सध्या ५७ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचे वीस, भाजपचे तेरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तेरा, माकपचे सहा, बहुजन विकास आघाडीचे पाच असे पक्षीय बलाबल आहे. राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तांतर झाल्यावर जिल्हा परिषदेतही फूट पडली होती. शिवसेनेचे वीसपैकी अकरा सदस्य शिंदे गटात सामिल झाले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाच्या हातातून सत्ता जाणार हे निश्चित झाले होते. पण, गेल्या आठवड्यात आठ पंचायत समिती सभापतीपदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक पंचायत समित्या ताब्यात घेत शिंदे गट आणि भाजपला धक्का दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता खेचून घेण्यासाठी शिंदे गट आक्रमक झाला होता. त्यातून जिल्हा परिषद सदस्यांची पळवापळवी सुरु झाली होती.

सत्ता स्थापनेची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीखाली आमदार रवींद्र फाटक यांच्यावर सोपवण्यात आली होती. अकरा सदस्यांना शिंदे गटाने लोणावळ्या नेले होते. तर नऊ सदस्यांना उध्दव ठाकरे गटाने पनवेलला नेले होते. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपासह तक्रारीही दाखल झाल्या होत्या. अखेर उध्दव ठाकरे यांच्या गटाकडे असलेले नऊही सदस्य आपल्याकडे वळवण्यात आमदार रवींद्र फाटक यशस्वी ठरले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. अध्यक्षपदाचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करणार आहेत.

उध्दव ठाकरे गटाकडे एकही सदस्य नाही
उध्दव ठाकरे गटाकडे आता एकही सदस्य राहिलेला नाही. शिंदे गटाकडे वीस सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी २९ सदस्यांची गरज आहे. भाजपकडे तेरा सदस्य असल्याने जिल्हा परिषदेत शिंदे गटाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गट-भाजपला बहुजन विकास आघाडी, जिजाऊच्या सदस्यांचाही पाठिंबा असणार आहे.

उध्दव ठाकरे गटाची हाराकिरी
जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यात उध्दव ठाकरे गट सपशेल अपयशी ठरला आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ पातळीवरून सदस्यांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी नालासोपार्‍यात मेळावा घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. त्याचा कोणताच प्रभाव पडला नाही. आमदार जाधव यांनी पालघरमध्ये मेळावा घेऊन सोबत पाठबळ दिले असते तर सदस्यांना बळ मिळाले असते. महत्वाची बाब म्हणजे पालघर जिल्ह्यात आक्रमक नेतृत्व नसल्याने ठाकरे गट कमकुवत झाला आहे. त्यामुळे लढाईच्या मैदानात उतरण्यापूर्वीच ठाकरे गटाकडून तलवार म्यान केल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे.

First Published on: November 15, 2022 9:47 PM
Exit mobile version