भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय

भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय

विरार : यंदा सलग मुसळधार पावसाची बरसात, निसर्गाचा लहरीपणा,या सार्‍याचा परिणाम भातशेतीवर झाला असतानाच आता तालुक्यातील अनेक भागांतील भातरोपांवर बगळ्या रोगाची लागण झाली असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.जास्त पाऊस पडला तरी नुकसान व कमी पाऊस पडला तरी नुकसान अशी परिस्थिती आहे. त्यातच सध्या भातपिकांना कणसे भरणीचा मोसम आला असताना तालुक्यात भातपिकांवर विविध भागांत मोठ्या प्रमाणावर बगळ्या रोगाची लागण होऊ लागली असल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. या रोगामुळे भातरोपावरील कणसासहीत संपूर्ण पाती सफेद पडते. या रोगावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र काहींना कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात आणता आला नाही तर काहींच्या हातून वेळ निघून गेली आहे. त्यामुळे या ना त्या तर्‍हेने शेतकर्‍यांचे नुकसान अटळ आहे. याचा परिणाम भात उत्पादनावर होत असून उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यंदा उशिरा आणि त्यानंतर सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकर्‍यांची भात रोपे कुजली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची भात लावणी उशिराने संपन्न झाली. या उशिराने लावणी करण्यात आलेल्या भात पिकांवर आता बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हजारो रुपयांचे पीक नष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वसई तालुक्यातील भात पिकाचे जुलै महिन्यात आलेल्या पुरात माती दगड शेतात घुसून नुकसान झाले आहे. तर काही शेतात माती घुसल्याने भाताचे पीक मातीत गाडले गेले. यातून सावरत असताना बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडू लागला आहे.भाताच्या पिकावर बगळ्या रोगाने शिरकाव केल्याने शेतकरी चिंतेत आहे. या रोगामुळे भाताचे पीक कीटकांनी अर्धवट खाऊन टाकले आहेत. या बगळ्या रोगाने भाताचे शेतात उभे असलेले हिरवेगार पीक पांढर्‍या रंगाचे होऊ लागले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. आता या भात शेतीवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकरी हवालदील झाला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भात शेती करणे कठीण झाले आहे. तालुक्यात काही ठिकाणी भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उभे हिरवे पीक पांढरे पडू लागले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची चिंता असून धान्याऐवजी हाती केवळ पेंढा शिल्लक राहतो की काय ही भीती निर्माण झाली आहे.

– मनोज किणी, शेतकरी

First Published on: September 18, 2022 10:23 PM
Exit mobile version