उत्तनला सर्वधर्मीय स्मशानभूमी

उत्तनला सर्वधर्मीय स्मशानभूमी

भाईंदर : मीरा- भाईंदरमधील सर्वधर्मीयांसाठी उत्तन येते महापालिकेने आपल्या विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी जागा राखून ठेवली आहे. त्याठिकाणी सर्वधर्मियांसाठी स्मशानभूमीच्या कामाला राज्य सरकारने वीस कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे लवकरच स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मिरा-भाईंदरमधील स्मशानभूमी, दफनभूमी व कब्रस्तानच्या जागेसंदर्भात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रताप सरनाईक व महापालिका आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते. मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्व जातीधर्मांचे लोक या शहरामध्ये वास्तव्याला येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अंत्यविधीकरता नगरपरिषदेच्या काळामधील सर्व कब्रस्तान व स्मशानभूमीची जागा निश्चित केलेली असल्यामुळे त्याठिकाणी अंत्यविधीसाठी जागा अपुरी पडत आहे.

याबाबत सर्व समुदायाने अंत्यविधीसाठी नविन जागा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरनाईक यांनी मागणी केली असता त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना मिरा-भाइर्दरमधील महसुल खात्याच्या जागेसंदर्भात अंत्यविधीकरता लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार झालेल्या बैठकीमध्ये मिरा-भाईंदर शहरामध्ये सर्वधर्मिय समाजासाठी अद्ययावत अशा अंत्यविधीकरिता उत्तन येथील सर्वे नं. ३५२/अ ही ५ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली.
मिरा-भाइर्दर महापालिकेतर्फे या जागेवर आरक्षण टाकण्यात आलेले असून ३७ च्या प्रक्रियेसाठी अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून महसूल खात्याची ही जागा महापालिकेकडे वर्ग झालेली आहे. भाईंदर पश्चिम व पूर्व येथे सर्वधर्मिय समुदायासाठी होणार्‍या स्मशानभूमी, दफनभूमी व कब्रस्तानसाठी २० कोटीपर्यंतचा निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार ताबडतोब नोव्हेंबरमध्ये जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होऊन पुढील दोन महिन्यात महापालिकेकडे जागा हस्तांतरीत होईल. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मिरा-भाइर्दरमधील अंत्यविधीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रोहित राजपूत, महसूल तहसिलदार राजेंद्र चव्हाण, मिरा भाईंदर आयुक्त तथा प्रशासक दिलिप ढोले, तहसिलदार युवराज बांगर, तहसिलदार नंदकुमार देशमुख, प्रांत अविनाश शिंदे, मिरा- भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार हेमंत ठाकूर, शहर अभियंता दिपक खांबित यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

First Published on: October 24, 2022 8:56 PM
Exit mobile version