गुजरातच्या दारू तस्करीत पालघरच्या पोलिसाचा सहभाग

गुजरातच्या दारू तस्करीत पालघरच्या पोलिसाचा सहभाग

बोईसर : महाराष्ट्रातील दारूची गुजरातमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये पालघरच्या एका पोलिसाचा देखील सहभाग असल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. केंद्रशासित दमण आणि दादरा नगर हवेली बनावटीची विदेशी दारू महाराष्ट्रात प्रतिबंधित असताना देखील चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात या दारूची तस्करी सुरू असते. दमण,सिलवासा आणि खानवेल येथील दारू पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुका मार्गाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तस्करी करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.अशा टोळ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी कारवाई करून मद्य साठा जप्त करण्यात आला आहे.

मात्र गुजरात राज्यात संपूर्ण दारूबंदी कायदा अस्तित्वात असताना पालघर जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई -अहमदाबाद महामार्गाने गुजरात मध्ये तस्करी केली जाणारी महाराष्ट्र बनावटीची विदेशी दारू गुजरात पोलिसांनी पकडली असून दारूच्या या तस्करीमध्ये तलासरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या धांगडा नावाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा देखील समावेश असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी भागातून मुंबई -अहमदाबाद हायवेमार्गे गुजरात राज्यातील सुरत येथे महाराष्ट्र बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची पक्की खबर वलसाड गुन्हे अन्वेशन विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दारू घेऊन येणारी महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही कार जीजे-०६ केडी ८२०८ थांबवून तपासणी केली असताना बेकायदेशीरपणे पाच लाख रुपये किमतीच्या ५५० दारूच्या बाटल्या आढळून आल्या.यावेळी गुजरात पोलिसांनी दारूची तस्करी करणार्‍या कारमधील नवीन रणछोडभाई वरिया व निरव उर्फ पिंटू मधुसूदन देसाई या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गाडीमधील दारू तलासरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धांगडा व त्याचा एक सहकारी याने सुरत मधील एका इसमास ही दारू पोहोचविण्यास सांगितले असल्याची कबुली दिली. या दारू तस्करीप्रकरणी वलसाड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिलाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.याप्रकरणी तलासरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांवर दारू तस्करीप्रकरणी व गुन्हा दाखल झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी पालघर पोलीस अधीक्षकांना दिली आहे.

First Published on: January 12, 2023 9:58 PM
Exit mobile version