मीरा भाईंदरच्या वाहतूक कोंडीवर उपाय आहे का ?

मीरा भाईंदरच्या वाहतूक कोंडीवर उपाय आहे का ?

भाईंदर : मीरा भाईंदर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरता काशिमीरा वाहतूक पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात. वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करत वाहतूक नियम तोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येते. शहरात ठिक-ठिकाणी ’वनवे, नो एंट्री, नो हँकिंग झोन, नो पार्किंग’ अशा अनेक प्रकारचे वाहतूक नियमांचे फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील शहरातील बेशिस्त वाहन चालक फलक लागलेल्या परिसरातून वाहन घेऊन जातात. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.यावर काही उपाय होणार की नाही असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत.

मीरा भाईंदर शहरात वाहतूक पोलीस प्रत्येक नाक्यावर उपस्थित असून दिवसभर त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. शहरात अनेक ठिकाणी ’नो एन्ट्री’ चे फलक लावण्यात आले आहेत. प्रामुख्याने भाईंदर पश्चिमेला बॉम्बे मार्केट शिवसेना गल्ली समोर भलामोठा फलक लावण्यात आला असून जैन मंदिर जवळ चक्क ३ बॅरिगेट लावून रस्ता एका बाजूने बंद करण्यात आला आहे. जेणे करून नो एन्ट्री मधून कोणी प्रवेश करू नये. मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्यामागे कुठेतरी शहरातील बेशिस्त वाहन चालक यांच्या सोबत काही वाहतूक पोलीस देखील जबाबदार आहेत. तसेच मीरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप सीएनजी पंप यांच्या बाहेर वाहनांच्या रांगांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक पोलीस त्यांना नियुक्त केलेल्या ठिकाणावर बर्‍याच वेळा उपस्थित नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास वाहन चालकांना हिंम्मत मिळत असल्याचे दिसून येत आहे. भाईंदर पूर्व व पश्चिम परिसरात अनेक ठिकाणी नो एन्ट्रीमध्ये वाहने ये जा करत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते.

दीपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट परिसर या ठिकाणी बर्‍याचदा वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवताना दिसून येतात.

एस. के. स्टोन ते काशीमीरा परिसरात अनेक गॅरेज असून त्यांच्याकडे दुरुस्ती करता आलेली वाहने रस्त्यावर नो पार्किंगच्या फलकाखाली उभी असलेली दिसून येतात.

भाईंदर पूर्व स्टेशन परिसरात बीएसटी बस चालक वाटेल तशा बस उभ्या करत असल्यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असते.

विमल डेरी परिसरात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत वाहतूक कोंडी होते मात्र आजवर कर्मचारी कमी असल्यामुळे बहुदा वाहतूक कोंडी निर्माण होऊन देखील वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नाही.

First Published on: August 24, 2022 8:29 PM
Exit mobile version