वसई प्रभागातील अतिक्रमणांवर फिरला जेसीबी

वसई प्रभागातील अतिक्रमणांवर फिरला जेसीबी

वसईः वसई आय प्रभाग समितीच्या विविध भागांत अतिक्रमण विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत अनेक अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम व रस्त्याला अडथळा ठरणारे शेड्स दुकाने यावर जेसीबीद्वारे कारवाई करण्यात आली.प्रभाग आयचे सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाने वसई बाजार, पारनाका, होळी बाजार, पापडी, नायगांव येथील विविध वाणिज्य शेड्स, अतिक्रमणे, दुकानाचे नामफलक निष्कासित केले. सकाळी १० वाजता सुरु केलेल्या सदर कारवाईत रस्त्यावर पसरलेल्या विविध दुकानांचे सामान अतिक्रमण पथकाकडून जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच वसई बाजार परिसरात दुकानदारांना सूचना देऊन नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तरी अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण हटवले नाही, अशा व्यावसायिकांवर आज थेट कारवाई करण्यात आली.

होळी बाजार येथील प्रमुख बाजारपेठेमध्ये बेकायला हातगाड्या दुकाने जेसीबीने निष्कासित केली. यावेळी व्यावसायिकांनी आम्हाला पालिकेने नोटीस दिलेल्या नसल्याचे व थेट कारवाई केली असल्याने आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप केला. यावेळी अधिकार्‍यांबरोबर अतिक्रमण धारकांची बाचाबाचीही झाली. विशेष म्हणजे रस्त्याने जाणारे पादचारी वाहनधारक यांनी स्वतःहून पुढे येऊन सहायक आयुक्त मोहन संखे यांच्या कारवाईचे स्वागत केले. मागील वीस वर्षांमध्ये अशा स्वरूपाची कधीच कारवाई झाली नसल्याचे काहींनी म्हटले. या कारवाई नंतर बेकायदा बांधकामधारक, अतिक्रमणधारक यांचे धाबे दणाणले आहेत. वसई पारनाका येथील बेकायदेशीर बांधकाम धारकांना गुरुवारी सूचना देण्यात आल्या असून येथे दोन दिवसांमध्ये येथील बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे संख्ये यांनी सांगितले.

०००

बॉक्स

वसई प्रभागांमध्ये बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमणावर यापुढेही टप्प्याटप्प्याने कारवाई होणार असून कुठल्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता आपण लोकहिताची कामे करणार आहोत. या कारवाईच्या दरम्यान आपण कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणार आहोत. बांधकाम धारकांनी आपल्या सर्व प्रकारच्या परवानग्या व नियम याचे भान ठेवून यापुढे बांधकामे करावीत नाहीतर पालिका प्रशासनाचा हातोडा त्या बेकायदा बांधकामावर येत्या काही दिवसांमध्ये पडणार असल्याचा इशारा सहायक आयुक्त मोहन संखे यांनी या कारवाईवेळी दिला.

First Published on: May 11, 2023 8:58 PM
Exit mobile version