संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर ; आदर्श आचारसंहितेत बँकाही सजग

संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर ; आदर्श आचारसंहितेत बँकाही सजग

जव्हार : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. आचारसंहिताही लागू झाली. या काळात विकासकामांच्या उद्घाटनापासून नवीन मंजुरीपर्यंतचे अनेक गोष्टीवर निर्बंध येतात. होणारे व्यवहार आणि पैसे वाटप सारख्या प्रकारावर विशेष लक्ष ठेवले जाते. एका बँकेतून दुसर्‍या बँकेत कॅश घेऊन जाताना आचारसंहितेचे पालन करावे लागते, अशी माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर प्रचार आणि त्यानंतर पैसे वाटपाचे प्रकारही घडतात. या काळात त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी निवडणूक विभागातर्फे व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या माध्यमातून तपासणी होते.बँकांनाही या काळात काही नियम असतात. यात प्रामुख्याने बँकांना करन्सी चेस्ट दुसर्‍या बँकेत घेऊन जाताना काळजी घ्यावी लागते. यासाठी कॅश घेऊन जाणार्‍यांना ओळखपत्र सोबत बाळगावे लागतात. यासह रक्कम किती आहे? याची माहिती घेऊन ती सीव्हीजीएल पोर्टलवर अपलोड करावी लागते. याची माहिती लिड डिस्ट्रीक मॅनेजरलाही द्यावी लागते. यामुळे बँकांची वाहन तपासणी होते. एटीएमसाठी कॅश घेऊन जाणार्‍यांसाठी रिझर्व्ह बँकेने नियमावली बनवून दिली आहे. तिचे पालन करणे गरजेचे आहे.

प्रत्येक खात्यावर नजर
आचारसंहितेच्या काळात प्रत्येक बँकेमधील व्हिजिलन्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यवहार आणि खात्यावर विशेष लक्ष ठेवून असतो. यात एखाद्या खात्यातून संशयास्पद मोठा व्यवहार झाल्यास त्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासादरम्यान योग्यरीत्या तपशील न दिल्यास त्या खातेधारकांवर कारवाई होऊ शकते. व्यवहार करताना सर्व पुरावे ठेवणे गरजेचे असल्याचेही बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

First Published on: March 25, 2024 9:09 PM
Exit mobile version