कुंदन संखे शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख, राजेश शहा यांची उपनेते पदी वर्णी

कुंदन संखे शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख, राजेश शहा यांची उपनेते पदी वर्णी

बोईसर: कुंदन संखे यांची शिवसेनेच्या पालघर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर सध्या जिल्हाप्रमुख असलेले राजेश शहा यांची उपनेतेपदी वर्णी लागली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत दोघांना ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. कुंदन संखे यांच्यावर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करुण यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख असताना कुंदन संखे यांनी अचानक २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोर येथील प्रचार सभेत आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.त्या नंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात संखे यांची पालघर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लावण्यात आली होती.मात्र जिल्ह्यात असलेल्या पक्षातील गटबाजीमुळे त्यांच्यावर कोणतीही विशेष संघटनात्मक जबाबदारी न देता त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कुंदन संखे यांनी देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे सोबत जाण्याचे पसंद केले होते.जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करून त्यांच्या या निष्ठेचे फळ त्यांना देण्यात आले आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर पालघर जिल्ह्यात देखील शिवसेना पक्षात मोठी फाटाफूट झाली.त्यामुळे जिल्हाप्रमुख म्हणून कुंदन संखे यांच्यासमोर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.पालघर प्रमाणेच बोईसर आणि विक्रमगड विधानसभा जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.

First Published on: April 24, 2023 9:25 PM
Exit mobile version