लीलाई दिवाळी अंक प्रतिकूल परिस्थितीतही टिकून

लीलाई दिवाळी अंक प्रतिकूल परिस्थितीतही टिकून

वसईः ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि चित्रकार यांच्या सहभागातून दर्जेदार अंक सातत्याने आणि वेळेवर प्रसिद्ध करण्याची परंपरा प्रतिकूल परिस्थितीतही टिकवून ठेवणार्‍या “लीलाई” दिवाळी अंकाच्या संपादकीय मंडळाचे कौतुक वाटते, असे गौरवोद्गार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तेविसाव्या “लीलाई” दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करताना काढले. यंदाच्या 23 व्या “लीलाई” दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते विरार येथे विवा महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समितीचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी, “लीलाई”चे संस्थापक संपादक अनिलराज रोकडे, वसई विरार महानगर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष झाकीर मेस्त्री, दै आपलं महानगरचे निवासी संपादक शशी करपे, रविंद्र माने, महानगर पत्रकार संघाचे खजिनदार विजय खेतले, कोमसाप, वसई शाखेचे कार्यवाह संतोष गायकवाड, मच्छिंद्र चव्हाण, चंद्रकांत भोईर यावेळी उपस्थित होते.

वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारा कला क्रीडा महोत्सव आणि विविध साहित्यिक उपक्रमांद्वारे मराठीचे संवर्धन, तसेच सांस्कृतिक वातावरण टिकवून ठेवणार्‍या आ. हितेंद्र ठाकूर यांच्या या महिन्यात साजर्‍या होत आसलेल्या एकसष्टीपूर्तीच्या निमित्ताने यंदाच्या लीलाई प्रकाशनाचा योग त्यांच्या हस्ते जुळून आणल्याचे अनिलराज रोकडे यांनी प्रस्ताविकात सांगितले. मराठी भाषा संवर्धन आणि साहित्य-कला जोपासण्यासाठी राज्यभर निघणारे दिवाळी अंक महत्वाची भूमिका बजावीत असून, नवा लेखक घडवितांनाच वाचक टिकवून ठेवण्याचे काम दिवाळी अंकांची परंपरा करीत आली आहे. सांस्कृतिक चळवळीतील एक महत्वाचा घटक असलेल्या दिवाळी अंकांची आणि त्यांच्या वाचकांची संख्या काहीशी रोडावते आहे, तिच्या वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी महापौर नारायण मानकर यांनी यावेळी केले.

First Published on: October 24, 2022 8:05 PM
Exit mobile version