शिक्षणाचे धडे,कुडाच्या, कौलारू घराच्या ओट्यावर, थंडीत

शिक्षणाचे धडे,कुडाच्या, कौलारू घराच्या ओट्यावर, थंडीत

महेश भोये,डहाणू: पालघर जिल्ह्यातील खेडो पाडी असलेल्या जिल्हा परिषद शाळांची दयनिय अवस्था नेहमीच समोर येत असते. अशाच एका डहाणू तालुक्यातील बांधघर केंद्रातील शेणसरी वरठा पाडा या शाळेची भीषण अवस्था पुढे आली आहे. या शाळेची इमारत काही वर्षांपासून पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. तरी सुद्धा या धोकादायक इमारतीत येथील गोर गरीब आदिवासी चिमुकले विद्यार्थी हे शिक्षणाचे धडे गिरवत होते.काही महिन्यांपूर्वी या इमारतीची अजून बिकट परिस्थिती झाल्याने येथील विद्यार्थ्यांना एका कुडाच्या कौलारू घराच्या ओट्यावर तेही थंडी , वार्‍यात उघड्यावर बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. या इमारतीकरिता येथील सरपंच साधना बोरसा, शिक्षक , विद्यार्थी पालक तसेच डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला या संदर्भात वारंवार लेखी तक्रार दिली आहे. याबाबत उत्तर देताना इमारतीच्या एकूणच जागेची पाहणी झाल्यावर या निरलेखणात घेण्यात आली आहे. तसेच ती लवकरच पाडण्यात येईल आणि या ठिकाणी या शाळेकरिता नवीन इमारत लवकरच मंजूर होऊन बांधण्यात येईल,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, काही महिने लोटून गेल्यानंतरही अद्यापही या इमारतीचे नूतनीकरण पत्रक अथवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यावर आता येथील विद्यार्थ्यांचे पालक काहीसे संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच धक्कादायक प्रकार हा डहाणू कैनाड मोर पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत आढळून आला होता.

पटसंख्येत घट

या अशा समस्यांमुळे अंदाजे ५०% जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी पटवारी घसरून शाळा बंद पडल्या आहेत. याशिवाय गोर गरीब घराण्यातील मुले एखाद्या खाजगी शाळेत आपले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्या मुलांना एकमेव आधार हा गावातील जिल्हा परिषद शाळा असतो. मात्र आता या सारख्या शाळांची दयनीय अवस्था पाहून अनेक पालक वर्ग आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यास नकार देत आहेत. त्या विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत ठेवण्यास पसंती दर्शवत आहेत.

प्रतिक्रिया

पूर्वी याच धोकादायक वर्ग खोलीत आमची मुले शिक्षण घेत होती. मात्र त्यानंतर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून येथील विद्यार्थ्यांना येथील जवळच्या घरातील उघड्या ओट्यावर बसावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या शिक्षण विभागाने लवकरात लवकर दूर करावी.

– जानु वरठा, पालक.

प्रतिक्रिया,

या शाळेची पाहणी केली होती. त्यानंतर या इमारतीचा अहवाल हा जिल्हा परिषद पालघर येथे निरलेखणासाठी पाठवला आहे. लवकरच नवीन इमारत प्रस्ताव मंजूर होऊन , इमारत बांधकाम सुरू करण्यात येईल. यासाठी आमचा सतत पाठपुरावा शिक्षण विभागाकडे चालू आहे.

– प्रवीण गवळी ,सभापती, डहाणू पंचायत समिती

First Published on: January 2, 2024 9:26 PM
Exit mobile version