कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये महावितरण सज्ज

कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये महावितरण सज्ज

वसई: महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून (दि. 4, 5 आणि 6 जानेवारी) ७२ तासांच्या संपावर जात आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई व पालघर या चारही मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात नसणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

प्रमुख मागण्या

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देवू नका, कंत्राटी, आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा,इम्पॅनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरणमधील २०१९ नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रामध्ये कायम कर्मचार्‍यांची पदस्थापना करा या मागण्यांसाठी राज्यभर द्वार सभा व निदर्शने करण्यात आली. संघर्ष समितीने ४ जानेवारीपासून संपावर जाण्याचे ठरविले आहे. हा संप वीज ग्राहकांविरोधात नसून, खासगीकरणाविरोधात असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा भागाचा समावेश असलेल्या वसई मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 7875760601 आणि 7875760602 हे मोबाईल क्रमांक आहेत. तर पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा समावेश असलेल्या पालघर मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 9028005994 आणि 9028154278 हे मोबाईल क्रमांक आहेत. नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक संप कालावधीत चोवीस तास सुरू राहणार आहेत. वीजेसंदर्भातील तक्रारी व माहिती देण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

First Published on: January 3, 2023 9:34 PM
Exit mobile version