पाण्याचा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करा; भाजपचे मनोज बारोट यांची मागणी

पाण्याचा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करा; भाजपचे मनोज बारोट यांची मागणी

पालकमंत्र्यांच्या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वसई विरार शहरातील पाणी प्रश्नासंबंधी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालकमंत्र्यांनी एका महिन्यात पाण्याचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तीन महिने उलटून गेले तरी अहवाल गुलदस्त्यात असून तो सार्वजनिक करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी आयुक्तांकडे केली आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्याचे कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वसई विरार येथे विकासकामांची आढावा बैठक बोलावली होती. त्यात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वाढत्या पाणी टंचाईबाबत प्रश्न उपस्थित केले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाण्याचे ऑडिट करण्याची मागणी केली होती. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत पाण्याचे ऑडिट करुन शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

तब्बल ३ महिने उलटून गेले तरी तालुक्यातील एकाही पाणी माफियावर महापालिकेने कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेने वॉटर ऑडिट केले की नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर समस्येबाबत भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी तक्रार केली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेने वॉटर ऑडिट केले असेल तर ते ऑडिट सार्वजनिक करण्यात यावे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली नवीन नळ जोडणी देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी. जेणेकरून टँकर माफियांकडून सुरू असलेली नागरिकांची लूट थांबेल आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार शुद्ध पाणी मिळू शकेल, अशी मागणीही बारोट यांनी केली आहे.

केंद्रातील सरकारच्या हर घर नल योजनेंतर्गत प्रत्येक महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असून या योजनेंतर्गत वसई विरार महापालिकेत प्रतिदिन प्रतिव्यक्ती ८० लिटर पाणी उपलब्ध आहे. असे असताना अनेक भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून त्रस्त आहेत. आजही काही भागात पाण्यासाठी नागरिक वणवण करत आहेत. त्याचा फायदा टँकर माफिया सर्रास घेत तालुक्यातील नागरिकांची खुलेआम लूट करत आहेत. आपले महापालिका अधिकारी पाणी माफियांसमोर हतबल दिसत आहेत. त्यामुळेच वसई विरार महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून नवीन नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद केली आहे की काय?, असा प्रश्न निर्माण होत असल्याची बारोट यांची तक्रार आहे.

हेही वाचा –

Thane : घोडबंदर रोडवर दुधाचा टँकर उलटला ; वाहतुकीचे वाजले तीन तेरा

First Published on: February 8, 2022 9:04 PM
Exit mobile version