Manor News: लोखंडी पाईपने युवकाचा पोलिसावर हल्ला

Manor News: लोखंडी पाईपने युवकाचा पोलिसावर हल्ला

मनोर: मनोर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार आयुब शेख शनिवारी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. ते रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मनोर पालघर रस्त्यावरील मासवन गावाच्या हद्दीतील प्रिया पेट्रोलपंपा वरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मासवण गावातील बँक ऑफ बडोदाच्या परिसरातील क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी जात होते. मासवण नाका येथे पोहोचल्यावर मासवन नागझरी रस्त्यावर वळण घेत असताना नाक्यावर एक कार समोर उभी राहिली रस्ता अडवल्याने पोलीस हवालदार आयुब शेख यांनी कार चालकाला कार बाजूला करण्याची विनंती केली होती.

कार बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने कार चालक गौरांग विशाल संखे याने शिवीगाळ सुरू केली. परंतु आयुब शेख यांनी ते पोलीस असल्याची माहिती देत शासकीय कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले. त्यानंतरही गौरांग संखे याने कारमधून लोखंडी पाईप काढत हवालदार आयुब शेख यांना मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी पोलीस हवालदार आयुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी गौरांग संखे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला भारतीय दंड संहिता ३५३,३२४,३२३,५०४,५०६ कलमान्वये अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

First Published on: April 28, 2024 10:46 PM
Exit mobile version