लक्झरी बसमधून आणला जाणारा मावा जप्त

लक्झरी बसमधून आणला जाणारा मावा जप्त

भाईंदर: गुजरातवरून नियमित येणार्‍या प्रवासी लक्झरी बसमधून आणला जाणारा २० गोणी मावा काशीगाव पोलिसांनी जप्त केला आहे. त्यातील काही मावा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने घेतला असून उर्वरित मावा हा नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईनंतर बस मधून मोठ्या प्रमाणात मावा आदी ऐन सणासुदीच्या दिवसात बाहेरून आणला जात असल्याचे उघड झाले आहे. गुजरातकडून येणार्‍या दोन लक्झरी बस मधून भेसळयुक्त मावा आणला जात असल्याची माहिती काशीगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक माणिक पाटील यांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मंगळवारी सकाळी महामार्गावरील काशीमीरा उड्डाण पूल सुरु होण्याआधी लक्ष्मीबाग येथे दोन बस मधून २० किलो मावा जप्त केला. सदर मावा गुजरात वरून बसमधून आणला जात होता, असे संबंधित इसमाच्या चौकशीत समोर आले. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्या नंतर अन्न प्रशासनाच्या सहायक आयुक्त धनश्री ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी भरत वसावे यांनी माव्याचे नमुने तपासासाठी घेतले. माव्याच्या तपासणीचा अहवाल आल्या नंतर संबंधित यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.या कारवाईतील उर्वरित मावा हा नष्ट करण्यात आला.

First Published on: April 9, 2024 10:14 PM
Exit mobile version