दोन सत्रात होणार गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

दोन सत्रात होणार गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात गोवर निर्मूलन प्रतिबंधात्मक योजना करण्यासाठी गुरुवारी पालिकेत पालिका आयुक्त दिलीप ढोले व टास्क फोर्सचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाचे उपयुक्त, डॉक्टर व विभाग प्रमुख यांची मिटिंग घेण्यात आली. त्यात शहरातील गोवर लसीकरण न-झालेल्या मुलांना गोवर लसीकरण करण्या संदर्भात सक्तीच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील ९ महिने ते पाच वर्षे काळातील लहान मुलांना लस देण्यासंदर्भात २५० शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

गोवर उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर शासनाने १५ ते २५ डिसेंबर २०२२ व १५ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान विशेष गोवर लसीकरणाच्या मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण मीरा- भाईंदर कार्यक्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करुन गोवर लसीच्या पहिल्या आणि किंवा दुसर्‍या डोससाठी पात्र मात्र लसीकरण न झालेल्या ५ वर्षापर्यंतच्या सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. मीरा- भाईंदर महानगरपालिका आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यक्षेत्रात २३ विशेष लसीकरण सत्रात व नियमित लसीकरणात पहिल्या डोससाठी पात्र ३२६ व दुसर्‍या डोससाठी पात्र ३९२ लाभार्थ्यांना गोवराची लस देण्यात येणार आहे. लसीकरणापासून वंचित लाभार्थी आढळल्यास त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही गोवर संशयित रुग्ण आढळल्यास त्वरीत संबंधित आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील गोवर १ ला व २ रा डोस न मिळालेल्या बालकांना जवळच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करुन घेण्याबाबत दवाखान्यात उपचारासाठी येणार्‍या सर्व पालकांना सूचित करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

First Published on: December 16, 2022 9:09 PM
Exit mobile version