मीरा- भाईंदरमध्ये शुक्रवारी एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद

मीरा- भाईंदरमध्ये शुक्रवारी एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. मीरा- भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे आणखी पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. दर आठवड्याला एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवत असल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा करणार्‍या एमआयडीसीकडून बारवी गुरुत्व वाहिनीचे काटई नाका ते शीळ टाकी दरम्यान तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

त्यासाठी शहराचा पाणीपुरवठा २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद केला जाणार आहे. यादरम्यान स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. तरी एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यत शहराला कमी दाबाने व उशीराने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

First Published on: February 21, 2024 7:51 PM
Exit mobile version