आमदार मनिषा चौधरींनी घेतली पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट

आमदार मनिषा चौधरींनी घेतली पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट

सफाळे: डहाणू ते वैतरणा स्थानकांदरम्यान भेडसावणार्‍या रेल्वे समस्यांवर चर्चा करण्यासाठी दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांची भेट घेतली. अपुर्‍या डहाणू उपनगरीय सेवा वाढविण्याची आग्रही मागणी महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली. सकाळी ७.०५ वाजता डहाणू रोड येथून सुटणारी लोकल कोविड काळात बंद करण्यात आली आहे. ही सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच सौराष्ट्र एक्सप्रेसच्या वेळेत बदल केल्यामुळे पालघर-डहाणू कडे येणार्‍या शिक्षक वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी, इतर प्रवासी यांची गैरसोय होत आहे. या सर्वांच्या सोयीसाठी सकाळी बोरीवली येथून नवीन डहाणू लोकल सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. सकाळी डहाणू वरून सुटणार्‍या १०.१० व ११.३५ विरार लोकलच्या दरम्यान अतिरिक्त विरार-बोरिवली लोकल सुरू करण्याबाबत, तसेच दुपारी विरार वरून सुटणार्‍या १२.२० व १.२० च्या डहाणू लोकल दरम्यान अतिरिक्त लोकल उपलब्ध करून देण्याबाबत ही सकारात्मक चर्चा झाली. विरारपर्यंत जाणार्‍या लोकल बोरिवली, अंधेरी, चर्चगेट पर्यंत विस्तारित केल्यास प्रवाशी थेट मुंबई पर्यंत प्रवास करू शकतील याकडेही महाव्यवस्थापक मिश्र यांचे लक्ष वेधण्यात आले.

रात्रपाळी करून घरी परतणार्‍या प्रवाशी वर्गासाठी डहाणू वरून अतिरिक्त मेमु सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच गर्दीच्या वेळी अतिरिक्त डहाणू लोकल चालू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल हे रेल्वे प्रशासनाला पटवून देण्यात आले. या सर्व मागण्या न्याय असून लवकरच डहाणू लोकल सेवा वाढवणार आहोत असे आश्वासन महाव्यवस्थापकांनी आमदार मनिषा चौधरी यांना दिले. रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिकानेर दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू केली आहे. बिकानेरकडे जाणार्‍या राणकपूर एक्सप्रेसला पालघर स्थानकातून सरासरी १ करोडचे उत्पन्न असून सुद्धा नवीन पुणे बिकानेर एक्सप्रेसला पालघर थांबा दिला गेला नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी या गाडीला पालघर स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र संपर्क क्रांती, दौंड इंदूर ,कच्छ एक्सप्रेस, भावनगर एक्सप्रेस सारख्या महत्त्वाच्या गाड्यांना पालघर स्थानकात थांबा देण्याची आग्रही मागणी महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली. नव्याने सुरू होणार्‍या गाड्या तसेच गणपती, दिवाळी तसेच सुट्टी दरम्यान धावणार्‍या हॉलिडे स्पेशल गाड्यांना पालघर येथे थांबे देण्यात यावे तसेच पालघर येथे थांबे दिल्यामुळे डहाणू ते विरार भागातील प्रवाशांना मुंबई कडे प्रवास करण्याचे कष्ट वाचतील व बोरिवली स्थानकाचा भार कमी होईल या वस्तुस्थिती कडे आमदार मनिषा चौधरी यांनी महाव्यवस्थापकांचे लक्ष वेधले.

बॉक्स

पर्यटन क्षेत्र, बागायती तसेच विविध शिक्षण संस्था असल्यामुळे घोलवड स्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. मात्र अपुरी रेल्वे सेवा असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी संजान,उंबरगावपर्यंत येणार्‍या मेमु सेवा डहाणू पर्यंत विस्तारित करून लांब पल्ल्याच्या गाड्यांना घोलवड स्थानकात थांबा द्यावा अशी मागणीही करण्यात आली.
सर्व मागण्यांचा विचार करून पालघर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना टप्याटप्याने तसेच हॉलिडे स्पेशल गाड्यांना प्राधान्याने थांबे देण्यात येणार असल्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले. यावेळी निमिष सावे, रेल्वे बोर्ड सदस्य जय लदाराम नागवाणी, संकेत ठाकूर उपस्थित होते.

First Published on: June 9, 2023 9:52 PM
Exit mobile version