Mokhada News: गोमघर ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम

Mokhada News: गोमघर ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम
मोखाडा  : मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून शासन वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवत आहे. शासनाच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत मोखाडा तालुक्यातील गोमघर ग्रामपंचायतीने गावच्या लाडक्या लेकीला तिच्या लग्नात माहेरची साडी देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. गावातील ज्या मुलीचे लग्न होईल तिला माहेरचा आहेर म्हणून ग्रामपंचायतीमार्फत एक पैठणी साडी लग्नातच भेट दिली जाणार आहे. तिचा विवाह मंचावर गौरवही केला जाणार आहे. गावात लेकींचा जन्मदर वाढावा म्हणून ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम सुरू केल आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
मुलीचा जन्म झाला की आजही नाकं मुरडली जातात. मुलगा होत नाही म्हणून होणारा सुनेचा छळ किंवा मुलीला तुच्छ वागणूक मिळणे यासारख्या या घटना देखील समाजात नवीन नाहीत. यावर उपाय म्हणून मोखाडा तालुक्यातील गोमघर ग्रामपंचायतीने नववधुस माहेरची साडी देऊन गौरविण्यात आले. मोखाडा तालुक्यात हा अनोखा उपक्रम राबविणारी गोमघर ग्रामपंचायत पहिलीच ठरली आहे. वाढती स्री-पुरुष असमानता, लिंग गुणोत्तरातील तफावत आणि स्री जन्माविषयी आजही समाजात रूढ असलेली मानसिकता बदलावी यासाठी गोमघर ग्रामपंचायतने हा लेकींचा सन्मान करणारा हा निर्णय घेतला आहे. लोकांचा मुलींविषयी असलेल्या दृष्टिकोनात बदल व्हावा म्हणून सदर उपक्रम हाती ग्रामपंचायतने घेतला आहे. तसेच गावच्या लेकीला गावाप्रती असलेली आपुलकी कायम राहावी यासाठी नववधूला लग्नात माहेरची साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलींसोबत संपूर्ण गावआपण स्वतः महिला असल्यामुळे मुलींसाठी काहीतरी करावे या हेतूने ग्रामपंचायतीसमोर हा विषय ठेवला. आणि सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले.यामुळे निश्चितच मुलगा मुलगी हा भेद कमी होण्यासही मदत होईल. शिवाय सासरी जाणाऱ्या प्रत्येक नववधूला संपूर्ण गावातर्फे माहेरची साडी दिली जाणार असल्याने संपूर्ण गाव आपल्या सोबत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होईल. मोखाडा तालुक्यातील गोमघर ग्रामपंचायतमध्ये लग्न होणाऱ्या नवऱ्या मुलीला ग्रामपंचायततर्फे माहेरची साडी भेट म्हणून दिण्यात येत आहे, ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे. या माध्यमातून बालविवाह थांबविण्यासाठी जनजागृती केली जाते, तसेच कुपोषण कमी करण्यासाठी फायदा होईल असे मत सरपंच  सुलोचना गारे यांनी व्यक्त केले.
मुलीच्या जन्माचे स्वागतच होईल..!
आधुनिक युगात जगात समाजात मुलगा-मुलगी हा भेद कायम आहे. ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमामुळे निश्चितच गावात मुलीच्या जन्माचे स्वागत होईल. जर गावात सन्मान झाला तर प्रत्येक घरात लेकीचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. गोमघर ग्रामपंचायतीने सुरू केलेला सन्मान लेकीचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे असे म्हणत मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी कौतुक केले
First Published on: May 3, 2024 10:05 PM
Exit mobile version