बोलीभाषेने वसईत सर्वधर्म स्नेहभाव जपला

बोलीभाषेने वसईत सर्वधर्म स्नेहभाव जपला

वसईः फादर स्टीफन्स यांनी चारशे वर्षांपूर्वी वसईत मराठी शाळेची स्थापना केली होती. मराठीला समृद्ध करण्यासाठी ख्रिस्ती समाज आणि वाडवळ समाजावर शब्दकोश तयार केला आहे. मराठीत आम्ही ख्रिस्ती बोलतो. लिहितो. व्यक्त होतो, ही वसईची खासियत आहे. या बोलीभाषेच्या सहाय्याने येथे सर्वधर्म स्नेहभाव जपला जातो, हे इथल्या मातीचे संचित आहे. आणि यामुळेच फक्त मुंबई पुणेच नाही तर वसईत साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक, साहित्यिक फादर फ्रान्सिस कोरीया यांनी नालासोपारा येथे बोलताना केले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त, साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित जागर मराठीचा हा कार्यक्रम तुळींज एज्युकेशन ट्रस्ट आणि संत ज्ञानेश्वर ग्रंथालय यांच्या सहकार्याने नालासोपार्‍यात मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कवी प्रशांत मोरे यांनी आपल्या पहाडी आवाजात कविता सादर करून वातावरणात चैतन्य आणले. ज्येष्ठ नाटककार, महाकादंबरीकार अभिनेते अशोक समेळ यांनी आपले स्वगत व्यक्त केले. समेळ यांनी सादर केलेल्या कुसुमाग्रजांच्या नाटकातील स्वगतांनी रसिक प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले. यानंतर लोककला अकादमीचे प्रा. शिवाजीराव वाघमारे व त्यांच्या सहकार्‍यांनी शाहिरी पोवाडे, भारुड या लोककलांचे सादरीकरण करुन उपस्थितांत तालमय वातावरण निर्माण केले. केएमपीडी शाळेच्या विद्यार्थ्यांसह परिसरात ग्रंथदिंडी काढून मराठीचा जागर करण्यात आला. पारंपरिक वाद्य ढोल ताशा, तुतारी, लेझीम खेळणारे विद्यार्थी, संत, समाज सुधारक, साहित्यिक इत्यादिंच्या निरनिराळ्या वेशभूषा केलेले विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थांचे पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संदेश जाधव यांनी प्रस्तावना केली. तुळींज एज्युकेशन ट्रस्ट आणि संत ज्ञानेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष दामोदर देशमुख, विश्वस्त दत्तात्रय देशमुख, माणिकराव दोतोंडे, मुख्याध्यापिका विद्या नाईक, वंदना नाईक, कल्पना चव्हाण, शैला डिसोजा, अ‍ॅण्ड्रयू कोलासो, अशोक मुळे, मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.

First Published on: February 29, 2024 6:43 PM
Exit mobile version