रोहयो मजुरांची आता ऑनलाइन हजेरी

रोहयो मजुरांची आता ऑनलाइन हजेरी

जव्हार : रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाने आता मजुरांची ऑनलाइन हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 20 पेक्षा जास्त मजूर असणार्‍या ठिकाणी हा नियम बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणावरून दोन वेळा ऑनलाइन हजेरी पाठवावी लागेल. यानंतरच मजुरांची मजुरी मिळणार आहे. तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील अकुशल कामगार आणि शेतमजुरांना आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार पुरवण्यात येत असल्याने मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत आहे. परंतु केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार रोजगार हमी योजनेतील 20 पेक्षा जास्त मजुरांची संख्या असल्यास ऑनलाईन हजेरी घेतली जाणार असून, याकरिता दोन वेळा काम करतानाचे फोटो आता अपलोड करावे लागणार आहेत, यामुळे बोगसमजुरांना आणि यंत्रांच्या साह्याने करण्यात येणार्‍या कामांना रोक लागणार आहे.

अनेकवेळा मशीनच्या मदतीने कामे करून कामावर मजूर असल्याचे दाखविले जाते. आता काम करणार्‍या मजुरांचे दिवसातून दोन वेळा फोटो अपलोड केले जाणार आहे. यामुळे दिवसभरात किती काम पार पाडले आणि दुसर्‍या दिवशी किती काम झाले, याची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला पाहता येणार आहे. यातून बोगस मजुरांना आळा बसेल. प्रत्यक्ष मजूर कामावर आहे की नाही ? हे काम कुठे सुरू आहे, परिसर कुठे आहे,अक्षांश आणि रेखांश या ठिकाणावर जाऊन मजुरांनी होत असलेल्या कामाचे फोटो काढायचे आहेत. याची संपूर्ण माहिती अक्षांश रेखांशमुळे जुळणार आहे. या ठिकाणावरून ऑनलाइन फोटो घेतल्यामुळे कामकाज किती झाले, दिवसभरात किती काम पार पडले याची सगळी माहिती रोहयो कार्यालयाकडे उपलब्ध होणार आहे.शिवाय दर 8 दिवसांनी ही संपूर्ण माहिती तपासल्यानंतर संबंधित मजुरांच्या खात्यामध्ये कामगारांच्या मजुरीचे पैसे बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत.

नॅशनल मोबाइल सिस्टिमच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतील मजुरांची कामे पारदर्शकतेने पार पडणार आहेत. ज्या कामावर 20 मॉनेटरिंगपेक्षा जास्त मजूर असतील अशा ठिकाणी, सकाळी कामावर रुजू होताच आणि दुपारी मध्यंतरीच्या काळात दोन वेळेस हे फोटो ऑनलाइन पद्धतीने पाठवणे गरजेचे आहे.याबाबत 9 प्रकारच्या यंत्रणांना वेळी वेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

– किशोर भराडे, अव्वल कारकून,

रोजगार हमी योजना,तहसील कार्यालय ,जव्हार

First Published on: September 5, 2022 10:43 PM
Exit mobile version