Palghar Anaganwadi News: कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

Palghar Anaganwadi News:  कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

पालघर : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका यांचे मार्च महिन्याचे मानधन एप्रिल महिना संपत आला तरी अजून पर्यंत झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा घटक आहेत. सहा प्रकारची कामे अंगणवाडी सेविका करत असतात. यामध्ये बालकांचे आहार, कुपोषित मुलांची काळजी, गरोदर मातांचे नियमित लसीकरण करणे, संदर्भ सेवा ही काम अंगणवाडी सेविका नित्यनेमाने करत असतात. आता अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिल्याने ऑनलाईन कामाचा व्याप सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक दिवस मानधन वाढीसाठी आंदोलन करून सुद्धा सरकारने यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यात वीस दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यानंतरही मानधन सेवा सरकार देत नसल्यामुळे राज्य व केंद्र सरकारवर अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मदतनीस म्हणून आदिवासी महिला काम करतात. त्यांचा नवराही घरीच असतो. त्यामुळे मिळणार्‍या मानधनांवर घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. त्यातच मानधन जोपर्यंत झाले नसल्याने यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे.

प्रतिक्रिया-१
अंगणवाडी कर्मचारी मानधनावर काम करत आहेत. दरमहा १ तारखेला मानधन होणे अपेक्षित आहे. आज वीस तारीख उलटून गेल्यावर सुद्धा अजून त्यांचे मानधन झालेले नाही. सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर मानधन अदा करावे.
–राजेश सिंग, संघटक चिटणीस, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

प्रतिक्रिया-२
अजूनपर्यंत मानधन झाले नसल्यामुळे सेविका आम्हाला मानधनांविषयी विचारत आहेत. पालघर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आदिवासी महिला मदतनिसांचे काम करतात. अजूनपर्यंत मानधन न झाल्यामुळे लग्नसराई व घराचा खर्च चालवायचा कसा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. लवकरात लवकर सरकारने त्यांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे. त्यांना होणार्‍या आर्थिक चणचणीतून मुक्त करावे
–सायली संखे, पालघर जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना,

First Published on: April 21, 2024 10:35 PM
Exit mobile version