पोलीस शिपाईपदाची लेखी परीक्षा 2 एप्रिलला

पोलीस शिपाईपदाची लेखी परीक्षा 2 एप्रिलला

भाईंदर :- मीरा-भाईंदर व वसई -विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा २६ मार्चला घेण्यात आली असून २ एप्रिलला पोलीस शिपाई पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा सुभाष चंद्र बोस मैदान आणि स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे मैदान या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तलयाच्या मार्फत देण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण १२ हजार १२७ पात्र उमेदवार असून त्यापैकी ३ हजार २६९ महिला व ८ हजार ८५८ पुरुष आहेत. भाईंदर पूर्वेच्या स्व. बाळा साहेब ठाकरे मैदान याठिकाणी महिलांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून पुरुषांची लेखी परीक्षा सुभाष चंद्र बोस मैदान येथे घेण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर व वसई -विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी २ जानेवारीला थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मुला- मुलींची शारीरिक चाचणी पूर्ण झाली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच थेट भरती होत आहे. ९९६ पदांच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले होते.प्राप्त झालेल्या ७१ हजार ९५१ अर्जांमध्ये ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश होता.भरती करता आलेल्या अर्जदारापैकी एकूण ४९,४७९ जणांनी भरती प्रक्रियेत त्यांची उपस्थिती दर्शवत मैदानी शारीरिक चाचणी पार पाडली. मैदानी शारीरिक चाचणीमध्ये ३५ हजार ९५६ उमेदवार पात्र ठरले, तर १३ हजार ५२३ उमेदवार शारीरिक चाचणी परीक्षेत अपात्र ठरले होते.

First Published on: March 29, 2023 8:36 PM
Exit mobile version