विरारमधील अनधिकृत बांधकामांना ’राजकीय पाया’

विरारमधील अनधिकृत बांधकामांना ’राजकीय पाया’

वसईः वसई-विरार महापालिका हद्दीतील विरार पूर्वेकडील मनवेलपाडा गावात उभी असलेली बहुतांश अनधिकृत बांधकामे ’राजकीय पाया’वर उभी असल्याने व ’सोन्या’ची अंडी देणार्‍या या बांधकामांवर ’प्रहार’ करण्यास महापालिकेने हात आखडता घेतला आहे. विरारमधील मनवेलपाडा गावातील स्मशानभूमीशेजारी व मागे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. येथील स्थानिक घरत व पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या बांधकामांना ’राजकीय पाठिंबा’ आहे. यातील एक बांधकाम प्रभाग-25 च्या माजी नगरसेविकेच्या पाठिंब्याने तर दुसरे बांधकाम एका माजी राज्यमंत्र्यांच्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी परप्रांतीय व्यक्तींच्या माध्यमातून बांधत असल्याचे माहिती या व्यक्ती स्वतः पेपरवर नसल्या तरी या बांधकामांना त्यांचा पाठिंबा असल्याने महापालिका या बांधकामांवर कारवाई करत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. ही बांधकामे येथील स्मशानभूमीच्या विकासात आडवी येत आहेत. शिवाय या बांधकामांनी रस्ताही अतिक्रमित केल्याने महापालिकेवर नाईलाजास्तव याठिकाणी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून नाल्यावर स्लॅब टाकून रस्ता बनवण्याची नामुष्की ओढवली आहे. दोन वर्षे उलटली तरी हा रस्ता पूर्ण होत नसल्याने परिसरात रहिवाशांना स्मशानभूमीतून मार्ग काढत जावे लागत आहेत. अनधिकृत बांधकामांकरिता पालिकेने लढवलेल्या या अनोख्या शक्कलेमुळे भविष्यात या नालेसफाईत अडथळा येण्याची शक्यता परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे.

ग्राहकांचे पैसे अडकून पडले

मनवेल पाडा गावातील स्मशानभूमीशेजारी असलेले हे बांधकाम भागिदारांतील ’आर्थिक वादा’त सापडले आहे. परिणामी या इमारतीत घर घेतलेल्या अनेक ग्राहकांचे पैसे अडकून पडले आहेत. एक घर दोघा-दोघांना विकले गेल्याने अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांनी पालिकेकडे धाव घेतलेली आहे. मात्र त्यानंतरही वसई-विरार महापालिका प्रभाग ’ब’चे सहाय्यक आयुक्त दयानंद मानकर व कनिष्ठ अभियंता कुणाल घरत यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतलेली नाही.

First Published on: November 17, 2022 10:07 PM
Exit mobile version