आरोग्य विभागातील ५ संवर्गातील पदांच्या भरतीला स्थगिती

आरोग्य विभागातील ५ संवर्गातील पदांच्या भरतीला स्थगिती

मोखाडा : सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ शासन निर्णयातील सुचनेनुसार महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील गट ’ क ’ मधील आरोग्य विभागातील ५ संवर्गातील पदांची परीक्षा १५ व १६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती.परंतु, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्याने या दोनही ठिकाणी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार होते.परिक्षार्थिंचे नुकसान होऊ नये म्हणून २६ ऑगस्ट २०२२ च्या ग्रामविकास विभागाकडील परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली आहे.कोरोना महामारीतील ्सन २०१९ पासून आरोग्य विभागातील भरतीची आशा धरून बसलेल्या असंख्य उमेदवारांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पांच संवर्गातील ६६८ पदांसह इतरही अधिकारी व कर्मचार्‍यांची ३२७ अशी एकूण ९९५ पदे रिक्त आहेत.त्यापैकी १२७ पदे कंत्राटी पद्धतीने भरलेली असून आजमितीस ८६८ पदे ही निव्वळ रिक्त आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांचा लक्षणीय आकडा असून त्यात मागील ३ वर्षात आणखी वाढ झालेली आहे.सन २०१९ मधील कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने मे २०२० च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते.ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक ही पदे आरोग्याशी संबंधित असल्याने व राज्यातील कोरोनाचा वाढता ् प्रादूर्भाव व साथरोगाची शक्यता लक्षात घेऊन मार्च २०१९ मधील जाहिराती नुसार आरोग्य विभागाशी संबंधित ५०% पदभरतीला मान्यता दिली होती.

त्यानुसार ऑगस्ट २०२१ मध्ये व पुढे ढकलल्यानंतर ऑक्टोबरमध्ये निवड प्रक्रिया राबविण्यात येणार होती.सदरचे काम हे मे न्यास कम्यूनिकेशन यांना सोपविण्यात आले होते.परंतु वेळोवेळी निरनिराळे शासन निर्णय पारित झाल्याने भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.मात्र मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार उक्त पदे ही जिल्हा परिषदेने जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा परिषद स्तरावरच भरण्याचे कळविले होते.त्यानुसार भरतीची प्रक्रिया सुरू होण्याचे चिन्ह असतानाच पुन्हा परीक्षेच्या तारखेचा घोळ घालण्यात आल्याने स्थगित झालेली भरती प्रक्रिया अनियमित काळ लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

समन्वयाचा अभाव
अराजपत्रित व संयुक्त मुख्य परीक्षा यांचा पूर्वपरीक्षा कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ जुलै २०२२ रोजी जाहीर केला होता.त्यानुसार या परीक्षा १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणे संयुक्तिक होते.तर ग्रामविकास विभागाने कोणत्याही प्रकारचा समन्वय न ठेवता ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील गट क मधील ५ संवर्गातील भरतीचा कालबद्ध कार्यक्रम २६ ऑगस्ट रोजी जाहीर करुन लोक सेवा आयोगाने मुक्रर केलेल्या तारखाच या परीक्षांसाठी जाहीर केल्या आहेत .त्यामुळे ग्रामविकास विभागाने समन्वय न ठेवल्यामुळे परीक्षेच्या तारखांचा गोंधळ झाला आहे.

First Published on: September 26, 2022 10:52 PM
Exit mobile version