संक्रमण शिबिरात अनाधिकृत बांधकामे करून झोपड्या भाड्याने

संक्रमण शिबिरात अनाधिकृत बांधकामे करून झोपड्या भाड्याने

भाईंदर :- मीरा -भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत जनता नगर, काशीमिरा येथील रहिवाश्यांकरिता बी.एस.यु.पी. प्रकल्प राबविण्यासाठी काशीगाव सिल्वर सरिता येथे त्यांचे स्थलांतर करुन त्याठिकाणी संक्रमण शिबिरात रहिवास देण्यात आला. मात्र त्याठिकाणी काही रहिवाश्यांनी स्वतःला दिलेली खोली सोडून त्याच संक्रमण शिबिराच्या मोकळ्या जागेत अनधिकृत शेकडो झोपड्या बांधून त्या भाड्याने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांनी त्यावर तोडक कारवाई करून ती जागा रिकामी करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्याकडे पत्र दिले आहे.

जनतेला चाळीच्या अरुंद जागेतून पक्की घरे व निवारा मिळावा म्हणून त्याठिकाणी केंद्र शासन, राज्य शासन व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस.यु.पी. प्रकल्प राबविण्यासाठी घरे खाली करण्यात येऊन त्यांना संक्रमण शिबिरात शिफ्टिंग देण्यात आली. मात्र त्याठिकाणी सर्रास लोकांनी बेकायदेशीर रित्या अनधिकृत झोपड्या बांधून त्या भाड्याने देण्याचा गोरखधंदा उभारला आहे. यात संक्रमण शिबिराच्या शेजारी चहूबाजूने पालिकेच्या आरक्षणाची मोकळी जागा असून त्याठिकाणी झोपड्या बांधल्याने कधी आगीची घटना घडल्यास त्याठिकाणी अग्निशमन विभागाच्या गाड्या जाग्यावर पोहोचताही येणार नाहीत. त्यातच त्यांना मिळणार्‍या लाईट, पाणी याचा बेकायदेशीर रित्या वापर सुरू असून सफाई कर्मचार्‍यांना साफसफाई करतानाही त्रास होत आहे.

First Published on: May 19, 2023 9:06 PM
Exit mobile version