पगार मोखाडा तालुक्यात काम पालघर तालुक्यात

पगार मोखाडा तालुक्यात काम पालघर तालुक्यात

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा झालेले असताना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी मात्र स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतात अशी घटना उघडकीस आली आहे. मरकटवाडी येथील घटना घडल्यानंतर हे गाव ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या खोडाळा आरोग्य केंद्रात एक नर्सच्या नावाने पगार काढला जातो. मात्र त्या काम पालघर तालुक्यातील सफाळे येथे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अगोदरच येथे नर्सेस कमी असताना हक्काची जाग कागदोपत्री भरलेली दाखवून सफाळे येथे प्रतिनियुक्ती दिलीच कशी? असा सवाल आता उपस्थित होत असून या घटनेची चौकशी होवून कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या खोडाळा उपकेंद्र सुर्यमाळ उपकेंद्र येथे आजही नर्स नाहीत.एवढेच काय ज्या आडोशी पथकांतर्गत मरकटवाडी येथे या ठीकाणची नर्सची जागा तब्बल दोन वर्षांपासून रिक्त होती. मात्र तालुका बदलीमध्ये अगदी महिनाभरापूर्वी सुर्यमाळ येथील नर्स तिथे देण्यात आल्या आहेत.यावरून एक घटना प्रकर्षाने जाणवत आहे. ती अशी की उपकेंद्रासारख्या ठिकाणी नर्सेस नाही पथकांना नर्सेस नाही अशी आबाळ असताना ओपीडी नर्स म्हणून एप्रिल महिन्यात हजर झालेल्या एका नर्सना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्याच दिवशी प्रतिनियुक्ती देण्याचा विक्रम केला आहे. यामुळे पगार घ्यायला मोखाडा आणि काम करायला पालघर असा अजबच प्रकार येथे समोर आला आहे.

यामुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळ करून आर्थिक हितसंबंधातून अशा प्रतिनियुक्त्या दिल्या जातात का? असाही प्रश्न यानिमित्ताने उभा राहत आहे.मुळात जिल्हा परिषद पालघरमध्ये लोकप्रतिनिधी राज नव्हे तर अधिकार राज चालत असल्याच्या भावना सर्व सामान्यांना मध्ये व्यक्त होत आहे.लोकप्रतिनिधीना अंधारात ठेवून लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होईल काय हा खरा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया -१
“आरोग्य व्यवस्था बळकटीसाठी मी सर्व केंद्रात रुग्णवाहिका माझ्या स्थानिक निधीतून दिला आहे. मुख्य रस्तेही जवळपास सर्वच झाले आहेत. मरकटवाडी सारख्या अनेक रस्त्यांच्या मंजुरीसाठी माझे प्रयत्न आहेत. मात्र प्रतिनियुक्त्यांचे असे प्रकार जर घडत असतील तर नक्कीच यातील दोषींवर कारवाईसाठी विरोधीपक्ष नेत्यांतर्फे आरोग्य मंत्र्यांना मागणी करणार आहे.
सुनिल भुसारा
आमदार विक्रमगड विधानसभा

प्रतिक्रिया -२
मी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कालच कळवले असून त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत एकीकडे याठीकाणी स्टाफ कमी असताना गेल्या पाच महिन्यांपासून पगार इथे काम दुसर्‍या तालुक्यात असा प्रकार घडत असेल तर खूप गंभीर बाब असून याची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी अशी माझी मागणी असून अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल.
प्रदिप वाघ
माजी सभापती, विद्यमान सदस्य पस मोखाडा

First Published on: August 22, 2022 9:31 PM
Exit mobile version