संसद भवनाच्या नकाशात शूर्पारक नगरीचा उल्लेख

संसद भवनाच्या नकाशात शूर्पारक नगरीचा उल्लेख

वसई : रविवारी भारताच्या नव्या संसद भवनाचे शानदार उद्घाटन झाले. यानव्या संसद भवनात देशातील पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक घटनांचा संदर्भ असलेला नकाशा लावण्यात आला आहे. या नकाशात वसई तालुक्यातील इतिहासात शूर्पारक नगरीचा उल्लेख करण्यात आला आहे. गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नालासोपार्‍याची इतिहासात शूर्पारक नगरी म्हणून ओळख आहे. शूर्पारक प्राचीन बंदर होते. त्याकाळात इजिप्त, कोचिन, अरेबिया, पूर्व आफ्रिकेशी व्यापार होत होता. येथील पूर्णा नावाचा व्यापारी उत्तर प्रदेशात गेल्यावर भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित झाला आणि त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. शुर्पारक नगरीत परतल्यावर त्याने एक चंदनाचा स्तूप बांधला होता. या स्तुपात भगवान बुद्ध ७० दिवस राहिले होते. हा स्तूप जमिनीत गाडला गेला होता. १८८२ साली उत्खननात हा स्तूप सापडला होता. हा स्तूप २ हजार ५५९ वर्ष जुना आहे. एप्रिल १८८२ मध्ये, भगवानलाल इंद्रजी, एक प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ, नाणकशास्त्रज्ञ आणि एपिग्राफिस्ट यांनी सोपाराजवळील मर्देस गावातील बुरुड राजाचे कोट टीला उत्खनन केले. बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाच्या मध्यभागी (विटांनी बांधलेल्या खोलीच्या आत) एक मोठा दगडी खजिना उत्खनन करण्यात आला. ज्यामध्ये मैत्रेय बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा होत्या.

सम्राट अशोकाने धम्मप्रसार सुरु केल्यानंतर त्याचा मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना याठिकाणी पाठवले होते. यादोघांनी येथून जगभरात बौद्ध धम्माच्या प्रसाराला सुरुवात केली. इतिहासात शूर्पारक नगरीच्या अनेक नोंदी आहेत. इ.स. संस्कृत ग्रंथ महावंशमध्ये सिंहली राज्याचा (आता श्रीलंका) पहिला राजा विजया सुप्परका (सोपारा) येथून श्रीलंकेला गेला असा उल्लेख आहे. टॉलेमीने या शहराचा उल्लेख सौपारा असा केला होता आणि त्याच्या काळात हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. जैन लेखकांच्या मते, श्रीपाल या पौराणिक राजाने सोपारकाचा राजा महासेनाची कन्या तिलकसुंदरी हिच्याशी विवाह केला होता. जिनप्रभासूरी (१४ वे शतक) यांनी त्यांच्या विविधातीर्थकल्पामध्ये सोपारकाचा उल्लेख ८४ जैन तीर्थांपैकी एक (पवित्र स्थान) म्हणून केला आहे. ऋषभदेवाच्या प्रतिमेचा उल्लेखही त्यांनी या शहरात त्यांच्या काळापर्यंत केला होता. शूर्पारक नगरीचे महत्व सांगणार्‍या अनेक वस्तू उत्खननात सापडल्या असून त्या दुर्मिळ वस्तू (अवशेष), सापडलेली नाणी आणि कलाकृती आजही मुंबई येथील एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयात पहावयास मिळतात. या पौराणिक आणि ऐतिहासिक शूर्पारक नगरीची दखल घेत नव्या संसदेच्या नकाशात कोरण्यात आली आहे.

First Published on: May 29, 2023 10:08 PM
Exit mobile version