सिंदीच्या झाडांची संख्या अल्प; ग्रामीण भागात ’लक्ष्मी’ व्यवसायाला अखेरची घटका

सिंदीच्या झाडांची संख्या अल्प; ग्रामीण भागात ’लक्ष्मी’ व्यवसायाला अखेरची घटका

जव्हार: घरातील स्वच्छता करण्यासाठी व सणासुदीला महत्त्व असलेल्या सिंदीच्या झाडूची म्हणजेच ’लक्ष्मी’ला हळद कुंकू लावून पूजा केली जाते; परंतु याच व्यवसायाला ग्रामीण भागात घरघर लागली असल्याचे दिसून येत आहे. कारण दिवसेंदिवस सिंदाडीचे झाड नामशेष होऊ लागल्याने गावात मिळणारी लक्ष्मी आता शहरातील बाजारातून अवाच्या सव्वा रुपयाने विकत घ्यावी लागत आहे. तालुक्यात आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये वृक्ष संवर्धनावर आधारित अनेक व्यवसाय छोट्या प्रमाणात करण्यात येत असतात. त्यात पानांपासून पत्रावळी आणि सिंदीच्या झाडांपासून लक्ष्मीपूजनाकरिता वापरण्यात येणारी झाडू हे अर्थाजनाचे पारंपारिक व्यवसाय आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून सिंदीच्या झाडांची संख्या वर्षानुवर्षे घटत असल्याने सद्यस्थितीत सिंदीच्या झाडांची संख्या अतिशय अल्प प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात लक्ष्मीपूजनाकरिता वापरण्यात येणार्‍या झाडांची संख्या कमी झाल्याने लक्ष्मी व्यवसायाला अखेरची घटका आल्याचे ग्रामीण भागात बोलले जात आहे.पूर्वीच्या काळी आदिवासी समाजातील काही व्यक्तींकडे उदरनिर्वाह करण्याचे कसलेच साधन नसल्याने दिवस भर डोंगरात फिरून सिंदाडीचे झाड शोधून त्याचे फडे कापून वाळायला टाकून झटकायचे. नंतर खांडा पाडायचा, जुळे धरायचे. नंतर पन्हाळीच्या फड्याची पड विणून त्याने लक्ष्मी (झाडू) बांधायची. तिची विरणी करून तिला आकार दिला जायचा. मग गावोगाव, दारोदार त्यांची धान्यावर विक्री करून कुटुंब चालवले जायचे. काळाच्या ओघात ही झाडे दुर्मिळ झाली. पिढी बदलली, किचकट काम असल्याने याकडे असलेला कल कमी झाला आणि या लक्ष्मी व्यवसायाला आता घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

पूजा करण्यासाठी जव्हार शहरातील बाजारातून सिंदीची झाडू म्हणजेच लक्ष्मी ही ६० ते ७० रुपयाला विकत घेऊन लक्ष्मीपूजनचे दिवशी तिची पूजा केली जाते. तालुक्यातील सिंदीच्या झाडांची दिवसेंदिवस संख्या कमी झाल्याने व आत्ताची पिढी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागातून हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय कालबाह्य होत चालला आहे.

नंदू शेठ जोशी,व्यवसायिक,जव्हार

First Published on: October 25, 2022 7:23 PM
Exit mobile version