तथाकथित पुनर्विकास कोकणी माणसाच्या जीवावर

तथाकथित पुनर्विकास कोकणी माणसाच्या जीवावर

वसई : विरार शहरातील मनवेलपाडा-कारगिलनगरमधील तथाकथित पुनर्विकास कोकणी माणसाच्या जीवावर उठला आहे. आधीच पोटापाण्याची साधने व नागरी समस्यांशी झुंजणार्‍या कोकणी माणसाची या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. येथील फुटकळ बांधकाम व्यावसायिकांनी स्वस्तात घरे देण्याच्या व चाळींचा पुनर्विकास करण्याच्या नावे लाखो रुपये उचल घेतली असल्याने अनेक गरीब व गरजू लोकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
गेल्या दोन दशकांत वसई-विरार भागात ग्रामीण भागातून नव्याने आलेल्या कोकणातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आश्रय घेतला आहे. रायगडपासून थेट सावंतवाडीच्या पट्ट्यातील लाखो कोकणी बांधव आज या भागात आपली ओळख निर्माण करून आहेत. नालासोपारा आणि विरारामधील मनवेलपाडा, कारगिल नगर, गास कोपरी हा भाग कोकणी लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. बहुसंख्य असूनही अन इथल्या मातीशी जुळवून घेऊनही कोकणी माणसाला महापालिकेने मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. रस्ते, पाणी, वीज, पायवाटा व बांधकाम व्यावसायिकांकडून येणार्‍या धमक्यांमुळे इथल्या कोकणी माणसांत आधीच नाराजी आहे. त्यात आता तथाकथित पाटील, घरत, शेख व अन्य परप्रांतीय बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिक स्वस्तात घरे देण्याच्या व चाळींचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत आहेत.

अनेक गरजू व गरीबांची चार लाखापासून 10 लाखांपर्यंतची रक्कम तथाकथित बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांकडे अडकून पडलेली असतानाही त्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. कित्येक बांधकाम व्यावसायिकांनी एकच घर दोघा-दोघा, तिघा-तिघांना विकून फसवणूक केलेली आहे. मात्र, लोकलज्जेस्तव यातील अनेकांनी पोलिसात तक्रार केलेली नाही. आजही अनेक जण घर मिळेल, या भोळ्या आशेवर दिवस ढकलत आहेत.गेल्या दोन दशकांत हजारो नागरिकांना अशा फसवणुकीला बळी पडावे लागले आहे. अनेकांची घरे अशा फसवणुकीत हातची गेली आहेत. केवळ आपली मुंबईत ‘खोली आहे, या आशेवर चाळीत राहणारा हा कोकणी माणूस सुरुवातीची काही वर्षे पाणी, रस्ते, वीज अशा समस्यांशी नेहमीच दोन हात करत राहिला आहे.

या परिसरातील स्थानिक पाटील, घरत कुटुंबीयांनी आपल्या काही जमिनी मुंबईतील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना विकल्या होत्या. उर्वरित हाताशी राहिलेल्या जागांवर या लोकांनी अनधिकृत चाळी उभ्या केल्या. यातील बहुतांश जण स्थानिक राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून होणारी फसवणूक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसत सहन करावी लागत आहे. आता या चाळी तोडून त्याठिकाणी हेच लोक स्वत: अथवा परप्रांतीय व्यक्तींना हाताशी धरून ४० : ६० अशा भागीदारीत चार ते पाच मजली इमारती बांधत आहेत. चाळीतल्या लोकांना घरे देऊन उर्वरित घरे अन्य लोकांना पाच ते १० लाखापर्यंत घर विक्री करत आहेत. या इमारती गल्लीबोळात उभारण्यात येत असल्याने या नागरिकांना रस्ता, पाणी व वीज अशा सुविधांसाठी झगडत राहावे लागते. परिणामी या इमारतींत राहणार्‍या महिलांना चार-चार, पाच-पाच मजले डोईवरून पाणी न्यावे लागते. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागते. शिवाय या इमारतींना दर्जा नसल्याने धोकाही कायम आहे.

First Published on: November 30, 2022 9:50 PM
Exit mobile version